पत्राचाळ घोटळ्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रथमच दिल्लीत दाखल झाले आहेत. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी लवकरच अमित शहा, नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर 22 नोव्हेंबर मंगळवारी ते दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीत आलो असल्याचे संजय राऊत म्हणाले.
मुंबईत गेल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस सध्या गुजरात दौ-यावर आहेत. ते मुंबईत आल्यानंतर मी त्यांना भेटेन, पण लपून वगैरे भेटणार नाही, तुम्हाला सांगून भेटेन, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी माध्यमांना दिली.
विरोधी पक्षातले असलो तरी आम्ही सहकारी आहोत
भेटीचे कारण विचारले असता, राऊत म्हणाले की, मला तुरुंग प्रशासनातील काही कर्मचा-यांचे प्रश्न आणि समस्या गृहमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडायच्या आहेत. जेलमध्ये असताना मी काही अभ्यास केला आहे. त्यातील नेमके मुद्दे घेऊन मी फडणवीसांशी चर्चा करणार आहे. विरोधी पक्षातले असलो तरी आम्ही सहकारी आहोत. मी खासदार आहे. त्यामुळे आम्ही कधीही भेटू शकतो, असे राऊत यांनी म्हटले.
( हेही वाचा: साई रिसाॅर्ट जमीनदोस्त होणार? सोमय्या राहणार उपस्थित )
…म्हणून महाराष्ट्र टिकून राहिला
ईडीच्या आरोपांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, अन्याय असत्याविरोधात लढायचे असेल तर त्याची मानसिक तयारी आम्हा सर्वांची आहे. सगळेच पळकुटे नसतात. काही लढणारे असतात. म्हणून महाराष्ट्र टिकून राहिला आणि देशात स्वातंत्र्याची मशाल पेटत राहिली आहे, असे वक्तव्य राऊतांनी यावेळी केले.
Join Our WhatsApp Community