शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्तारांच्या औरंगाबाद येथील सिल्लोड मतदारसंघात जाऊन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतक-यांशी झालेल्या संवादात आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांना लक्ष्य केले आहे.
तर मी आजपासून छोटा पप्पू…
काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी माझा उल्लेख छोटा पप्पू असा केला होता. मी ते नाव स्वीकारतो. जर माझं नाव छोटा पप्पू ठेवल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांना 24 तासांत नुकसान भरपाई मिळणार असेल, तर आजपासून माझं नाव छोटा पप्पू, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
(हेही वाचाः KGF-2 सिनेमातील गाण्यांचा काँग्रेसला फटका, ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याचे न्यायालयाचे आदेश)
सरकार तीन महिन्यांत कोसळणार
आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड येथे बोलताना अब्दुल सत्तार यांच्यावर तोफ डागली आहे. तुम्ही गद्दार आहात आणि गद्दारच राहणार आहात. तुम्हाला आम्हाला जी नावं द्यायची आहेत, ज्या शिव्या द्यायच्या आहेत त्या द्या. पण हे सरकार येत्या तीन महिन्यांत कोसळणार, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
असे राज्यकर्ते तुम्हाला मान्य आहेत का?
अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत जे विधान केले ते बोलण्यासारखे सुद्धा नाहीत असे वाईट शब्द आहेत. मंत्री असताना जर अशाप्रकारे विधान केले जात आहे तर असे राज्यकर्ते महाराष्ट्राला हवे आहेत का? सुप्रिया सुळे या खासदार आहेत हे सोडून द्या, पण आपण कोणाबद्दलही बोलताना एक संयम बाळगतो.
(हेही वाचाः ‘…तर एकतर्फी कारवाई होईल’, राज्य महिला आयोगाची भिडेंना दुसरी नोटीस)
कारण आपल्या देशात आपण सगळ्यांना जास्तीत जास्त आदर देण्याचा प्रयत्न करतो. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे घाणेरडं आणि शिवीगाळीचं राजकारण चाललं आहे ते तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
Join Our WhatsApp Community