विधिमंडळ अधिवेशनात शिंदे गटाच्या नेत्यांना घेरण्यासाठी उद्धव सेनेकडून दररोज नवी रणनीती आखली जात असताना, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच उद्धव सेनेच्या मदतीला धावून आले आहेत. पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या उद्धव गटाच्या आमदाराला अटक करण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘रविभवन’ इमारतीला वेढा घातलेला असताना, या आमदाराला अटकेपासून संरक्षण देऊ, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
आमदार नितीन देशमुख यांनी केलेली मारहाण
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी मंगळवारी ‘रवी भवन’ इमारतीबाहेर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांशी असभ्य वर्तन करून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच यावेळी पोलिसांवर अरेरावी करून त्यांना धक्काबुक्की करून आपल्यासह आलेल्या कार्यकर्त्याना रवी भवन परिसरात प्रवेश मिळवून दिला. त्यांच्या या दादागिरी विरोधात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून नागपूर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणते गुन्हे दाखल केले?
यामध्ये सरकारी कामात हस्तक्षेप करणे, सरकारी कर्मचाऱ्यांशी बोलताना अपशब्द वापरणे, त्यांना शिवीगाळ करणे याबाबत भादवी संहिता 353, 186, 448, 294, 506 आणि 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी आमदार अनिल परब यांनी विधानपरिषद सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत, अधिवेशन सुरू असताना एखाद्या सदस्याला कामकाजात सहभाग घेण्यापासून रोखणे, ही गंभीर बाब आहे. ३५३ कलमाचा बेकायदेशीर वापर करीत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याची सरकारने दखल घेऊन कलम ३५३ रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली. त्यावर, सर्व प्रकरणाची माहिती घेऊन उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, आपल्या उत्तरापर्यंत या आमदाराला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्यावर संबंधित आमदाराला अटक केली जाणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
Join Our WhatsApp Community