चिन्ह आणि नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप दिले गेले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर केला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून १२ मुद्द्यांचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले असून यामध्ये आयोगाकडून आमच्यासोबत भेदभाव झाल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी मशाल हे निवडणूक चिन्ह दिले असून शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिले. तसेच आयोगाकडून ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अशी नवीन पक्ष नावे दिली. मात्र, तरीही ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
(हेही वाचा – लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच, मनसे नेत्याच्या ट्वीटने वेगळाच ट्विस्ट)
काय म्हटले आहे ठाकरे गटाने पत्रात…
- नाव आणि पक्ष चिन्ह वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यामध्ये आयोगाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.
- आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणून बुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनिती समजली. दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते. अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे वकील विवेक सिंह यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे सोपावले आहे.
- दरम्यान, ठाकरे गटाला मशालचे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाला नेमके कोणते चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. अखेर आयोगाने आपला निर्णय जाहीर केला असून शिंदे गटाला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे.
- ठाकरे गटाकडून त्रिशुळ, मशाल आणि उगवता सूर्य या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. तर शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूल या चिन्हावर दावा केला, त्यासह शिंदे गटाने गदा हा पर्याय देखील दिला होता. मात्र धार्मिक मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने गदा, त्रिशुळ ही चिन्ह बाद केली. तर उगवता सूर्य हे चिन्ह आधीच एका पक्षाकडे असल्याने ते कोणालाही दिले नाही.