राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे गटातून इनकमिंग सुरू झाले आहे. आधी शिवसेनेचे 40 आमदार आणि नंतर 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. इतकंच नाही तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी देखील नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद ही दिवसेंदिवस वाढत असताना आता शिंदे गटाच्या खासदाराच्या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटातील 8 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा मोठा गौप्यस्फोट असल्याचे म्हटले जात आहे.
(हेही वाचाः ‘हिमालयातून आलेल्या राज्यपालांना कळावं म्हणून…’, मनसेने राज ठाकरेंच्या आवाजात प्रसिद्ध केलेला व्हिडिओ नक्की बघा)
खासदार आणि आमदार कोण?
शिंदे गटाचे बुलढाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील 3 खासदार आणि 8 आमदार 100 टक्के शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे आमदार,खासदार नेमेके कोण याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
ठाकरे गटात चाचपणीला सुरुवात
याआधी देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील एक खासदार शिंदे गटात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आता जाधवांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे ठाकरे गटातही चाचपणी व्हायला सुरुवात झाली आहे.
(हेही वाचाः ‘दोन महिन्यात राज्यात काय होईल हे सांगता येणार नाही’, भाजपच्या मंत्र्याच्या विधानाने खळबळ)
Join Our WhatsApp Community