ठाकरे सरकार एसटी कर्मचाऱ्याच्या बेधडकपणाला घाबरले!

सरकारने एका साध्या एसटी कर्मचाऱ्याला घाबरणे हे अत्यंत पोरकटपणाचे आहे. बहुदा या सरकारला सत्य झोंबले आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

90

एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात मोदी सरकारवर वाटेल ते आरोप करणाऱ्या ठाकरे सरकारने एका एसटी कर्मचाऱ्याच्या टीकेला घाबरून त्याला निलंबित केले. यामुळे या सरकारचे पायच किती मातीचे आहेत हे समोर आले आहे, अशी जळजळीत टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदीवली (पू.) चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. सरकारविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत प्रवीण ज्ञानेश्वर लढी या एसटी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. हे कृत्य अत्यंत निषेधार्ह असून या मुस्काटदाबी विरोधात भाजपा कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहील, अशी ग्वाहीदेखील भातखळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिली आहे.

‘त्या’ कर्मचाऱ्याने मंत्र्यांना खंडणीखोर म्हटले!

यवतमाळ आगारात कार्यरत असलेल्या प्रविण लढी यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर काही मजकूर प्रसिद्ध केला होता. त्यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लढी यांनी त्या पोस्टमध्ये सरकारचा उल्लेख महावसुली खंडणीखोर असा केला होता. महावसुली खंडणीखोर चोरटोळीला अंबानीच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. पण राज्यात ऑक्सिजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. 100 कोटी वसुली सरकार, अशी ती पोस्ट होती. संबंधित कर्मचारी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर 20 जुलै पासून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा : कोरोना निर्बंधातून मुंबई सुटणार, पण लोकलचे काय?)

सरकारला सत्य झोंबले!

ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन तीन मोठे पक्ष आहेत व एकाहून एक दिग्गज नेते सरकारमध्ये आहेत, त्या सरकारने एका साध्या एसटी कर्मचाऱ्याला घाबरणे हे अत्यंत पोरकटपणाचे आहे. बहुदा या सरकारला सत्य झोंबले आहे असे दिसते, या कर्मचाऱ्याची विधाने खोटी असती तर ती सरकारला लागण्याचे काहीच कारण नव्हते. पण खाई त्याला खवखवे ही म्हण खरी असल्याचे सरकारने आपल्या दडपशाहीच्या कृतीतून दाखवून दिले आहे. हा अन्यायकारक आदेश मागे घ्यावा, अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.