बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्यानंतर ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यांच्या विधानानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून सुद्धा त्यांना चांगलेच सुनावण्यात आले होते. आता तर जावेद अख्तर यांनी केलेले हे वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले असून त्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.
न्यायालयासमोर हजर राहावे लागणार
संघाच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर ठाण्यातील न्यायालयात खटला दाखल केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे न्यायालयाने याची दखल घेत, जावेद अख्तर यांना 12 नोव्हेंबर रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
(हेही वाचाः संघाला पाठिंबा देणारे तालिबानी मानसिकतेचे! जावेद अख्तर यांचे वादग्रस्त विधान)
काय होतं जावेद अख्तर यांचे वक्तव्य?
भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे जे समर्थन करतात त्यांची मानसिकता ते तालिबानी प्रवृत्तीचेच आहेत, असे विधान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी केले होते. यावरुन त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती.
सामनातून खडे बोल
संघाचे हिंदुत्व व्यापक आहे, ते सर्वसमावेशक आहे. त्यात मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, महिलांचे हक्क अशा पुरोगामी विचारांना स्थान आहे. संघ किंवा शिवसेना तालिबानी विचारांचे असते तर या देशात तिहेरी तलाकविरुद्ध कायदे झाले नसते व लाखो मुसलमान महिलांना स्वातंत्र्याची किरणे दिसली नसती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे, याबाबत दुमत असण्याची शक्यता नाही, असे खडे बोल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून जावेद अख्तर यांना सुनावण्यात आले होते.
(हेही वाचाः संघ राष्ट्रीय बाण्याची संघटना! शिवसेनेने जावेद अख्तरांना सुनावले )
Join Our WhatsApp Community