ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्यास सुरुवात; रविवारी पाच माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

149

मागच्या काही दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना ठाण्यात रंगला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळ्याला लागल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण आता ठाण्यात राष्ट्रवादीला प्रत्यक्षरित्या खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह पाच माजी नगरसेवक रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः हणमंत जगदाळे यांनी सोशल मीडियावर निवेदन जारी करून दिली आहे.

हणमंत जगदाळे काय म्हणाले?

‘गेली अनेक वर्षांपासून ठाणे शहरातील राजकारण व समाजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे आपल्याला ज्ञातच आहे, या काळामध्ये आपल्या सर्वांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मला सहकार्य झाले आहे. अगदी कठीण काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी आपुलकीने माझ्या प्रत्येक सुख-दुःखात मला मोलाची साथ दिलीत.’

‘अनेक वर्षापासून मी ठाण्याच्या राजकारणात आहेच, परंतु सन २०१४ पासून सातत्याने विचार करतोय की, राजकारणात राहून आपण आपल्या विभागाचा विकास करायचा असेल? तर काही राजकीय दृष्ट्या वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सतत माझ्या व माझे सहकारी यांच्या मनात येत होते. परंतु गेली ५० वर्षे एकाच विचारधारे सोबत काम केल्यामुळे, मन तयार होत नव्हते, परंतु काळ, वेळ आणि वय कोणासाठी थांबत नाही, हे ही तितकेच सत्य आहे, एका बाजूला भावना आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य…!! यामध्ये कर्तव्याला प्राधान्य द्यायला पाहिजे, असा मतप्रवाह माझ्या व माझे सर्व सहकारी यांच्या मनात आला. त्या पाठीमागचा एकमेव उद्देश म्हणजे लोकमान्यनगर-शास्त्रीनगर- सहकारनगरचा विकास हाच आहे. राजकारण आणि समाजकारणात काहींची “प्रगती” तर काहींची “अधोगती” झाली आहे.’

(हेही वाचा – पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १८, १९ फेब्रुवारीला थेट मैदानात उतरणार अमित शाह?)

‘पण माझ्याबाबतीत आपण म्हणाल, तर मी जिथे आहे तिथेच आहे, गेली अनेक वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात आहे त्याच परिस्थितीत आहे. हे आपल्या सर्वांना चांगलेच ज्ञात असताना आपल्या वयाचा व बदलत्या परिस्थितीचा विचार केला तर, ज्या नागरिकांनी इतके वर्षे आपल्यावर विश्वास टाकला आहे, त्या नागरिकांच्या विकासासाठी योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे, नाहीतर काळ हा आपल्याला कधीच माफ करणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.’

‘वरील सर्व एकंदरीत परिस्थितीचा सारासार विचार करता आणि सर्व बाबी लक्षात घेता, मी व माझे सर्व सहकाऱ्यांनी रविवारी दिनांक: १२/०२/२०२३ रोजी सायंकाळी ठिक: ०६.०० वाजता, लक्ष्मीपार्क सर्व्हिस रोड वरील मोकळ्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या साक्षीने शिंदे साहेबांच्या गटा सोबत जाण्याचा विचार निश्चित केला आहे.’

‘तरी मी या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष व ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी तसेच ज्येष्ठ सहकारी यांनी मला गेली अनेक वर्षांपासून प्रेम, मानसन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. यापुढे सुद्धा राजकारण व समाजकारणमध्ये वावरत असताना आपले स्नेह संबंध आहेत तसेच राहतील ही अपेक्षा.’

(हेही वाचा – अधिवेशनापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीतील १० ते १५ आमदार फुटतील; बच्चू कडूंचा दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.