ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई, नेत्यांसमोर कार्यकर्त्यांची हमरीतुमरी

राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत जरी सख्य असले तरी ठाण्यात मात्र दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांमध्ये चढाओढ लागली आहे. ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीतील दोन पक्षातील कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सुरु होता.

कार्यकर्त्यांसह नगरसेवकही भिडले

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये या विषयावर खूपच बाचाबाची झाली. यानिमित्ताने हे दोन्ही पक्ष राज्यात जरी एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर आली आहे, या सगळ्या वादाला सुरूवात बॅनरबाजीवरून झाली. कळव्यातील खारीगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद उफाळून आला. सुरुवातीला शिवसेनेचे बॅनर दिसत होते, त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले, काही वेळातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही बॅनर लावले. राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी बॅनर लावल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. काही वेळातच हा वाद फक्त बॅनरबाजीवर थांबला नाही, तर थेट हमरातुमरीवर पोहोचला. यावेळी पाठपुरावा आम्ही केला आणि बॅनरबाजी तुमची हा दोन्हीकडील कार्यकर्त्यांचा समज होता. कार्यकर्ते तर एकमेकांना भिडलेच, मात्र नगरसेवकही मागे राहिले, यावेळी नगरसेवकांमध्येही जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली.

(हेही वाचा अजित पवारांनी मानले, आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री!)

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील खारीगाव उड्डाणापुलाचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाडही व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र कार्यकर्त्यांना याचेही भान राहिले नाही. अखेर आव्हाड यांनी महाविकास आघाडीचा विजय असो, अशा घोषण देण्यास सुरुवात केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here