कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने, गौरी गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांचा उत्साह यंदा दुणावला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कोकणवासीयांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी मनसेकडून तब्बल १०० बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. दरम्यान, यंदा कोकणसाठी विशेष ”मनसे एक्सप्रेस” देखील मोफत सोडण्याचा संकल्प अविनाश जाधव यांनी बोलून दाखवला.
गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे कोकणवासीय आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. आता कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असला तरी, नियम शिथिल करण्यात आल्याने, मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाणार आहेत. मात्र, गणेशोत्सवाच्या चार महिन्याआधीच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने, चाकरमान्यांसमोर गावी कसे जायचे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेशभक्तांच्या मदतीला धावली आहे. गणपतीला जाऊ इच्छिणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी मनसे १०० मोफत बसेस सोडणार आहे. यासाठी ठाण्यातील गणेशभक्तांनी महाड, खेड, दापोली, मंडणगड, चिपळुण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, साखरपा, राजापूर कणकवली, देवगड, मालवण, सावंतवाडी, सुधागड-पाली तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली – सातारा येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध असून गणेशभक्तांनी मनसे मध्यवर्ती कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे. दरम्यान, यंदा प्रवाशांची संख्या वाढली असल्याने, ठाणे ते सावंतवाडी ”मनसे एक्सप्रेस” सोडण्याचा संकल्प अविनाश जाधव यांनी केला आहे.
( हेही वाचा: कर्ज पुन्हा महागलं; रेपो रेटमध्ये 50 बेसिस पाॅईंटची वाढ )
चौकट – मनसे कार्यालयात नोंदणीसाठी झुंबड
मनसेमार्फत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची नौपाड्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयात अर्ज घेण्यासाठी झुंबड उडत आहे. १२,१३,१४ ऑगस्ट रोजी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील नागरीकांसाठीच ही मोफत बस सेवा उपलब्ध असून, अर्जासोबत प्रवाशांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. एकदा बुकींग केल्यानंतर तारीख बदलता येणार नाही. २७,२८ आणि २९ ऑगस्ट रोजी बसेस ठाण्यातून रवाना होतील. तर, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ठाणेकरांसाठीही यंदा बसेस सोडण्यात येणार आहेत. अशी माहिती मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community