महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचा-यांचे शोषण केले आहे. शरद पवार सत्तेत नाहीत, पण त्यांचा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी याचा विचार करावा असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. ते ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
आंबेडकरांचे आवाहन
कोणाच्याही घरावर हल्ला करणे हे चुकीचेच असून, याचा आम्ही निषेध करतो. मात्र, एसटी कामगारांची न्यायालयात ज्या पद्धतीने बाजू मांडायला पाहिजे होती तशी बाजू मांडली गेली नाही. न्यायालयाने कामावर रुजू होण्याची एक संधी दिली आहे. त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
( हेही वाचा: एसटीतील कंत्राटी भरतीचा निर्णय तूर्तास स्थगित! )
योग्य बाजू मांडली गेली नाही
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, तेव्हाच भूमिका मांडली होती की, तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका, आता न्यायालयाने संधी दिली आहे, उर्वरित प्रश्न नंतर सोडवता येतील, मात्र आता कामावर रुजू व्हा. शिवनेरीच्यामार्फत ज्यावेळी खाजगीकरण झाले तेव्हाच लढा द्यायला हवा होता, मात्र संपाबाबत जर न्यायालयात योग्य बाजू मांडली असती, तर जेवढे अभय न्यायालयाने दिले आहे त्याहून आणखी अभय दिले असते, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.