सामनाची ‘रोखठोक’ भाषा ‘नरमली’? राज्यपालांचे मानले आभार

गुरुवारी सामानच्या अग्रलेखातून राज्यपालांना मदमस्त हत्तींची उपमा देण्यात आल्याने या टीकांवर ‘अंकुश’ कोण ठेवणार, अशी चर्चा होत होती.

129

राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातल्या वादांची प्रचिती राज्यातील जनतेला वारंवार येत आहे. सरकारमधील नेत्यांकडून टीका तर केली जातेच, पम शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सुद्धा राज्यपालांवर वारंवार टीका केली जात असते. गुरुवारी सामानच्या अग्रलेखातून राज्यपालांना मदमस्त हत्तींची उपमा देण्यात आल्याने या टीकांवर ‘अंकुश’ कोण ठेवणार, अशी चर्चा होत होती. पण गुरुवारी राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर आपली मोहोर उमटवल्यानंतर लगेचच शुक्रवारी सामनातील अग्रलेखातून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. सामनातील रोखठोक भाषा काहीशी सौम्य झाल्याचे या अग्रलेखातून दिसत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

राज्यपालांचे आभार

ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्याने त्यांचे आभार मानण्यास हरकत नाही, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. राज्य सरकारने पूर्वी पाठवलेल्या अध्यादेशात त्रुटी दाखवत राज्यपालांनी तो परत पाठवला. पण त्यानंतर सरकारने तयार केलेल्या सुधारित अध्यादेशात त्यांना काही वावगे आढळले नसावे.

(हेही वाचाः अखेर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा! राज्यपालांची अध्यादेशावर स्वाक्षरी)

शालजोडीतील टीका

पहिला अध्यादेश परिपूर्ण नाही असे पहिल्या अध्यादेशाच्या बाबतीत राज्यपालांच्या राजकीय सल्लागारांचे म्हणणे पडले. आता त्यांचे राजकीय सल्लागार कोण, हे फोड करुन सांगायची गरज नाही, अशी शालजोडीतील टीकाही राज्यपालांवर करण्यात आली आहे. पण तरीही त्या त्रुटी राज्याच्या मंत्रिमंडळाने झटपट दूर करत सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला आणि त्यावर राज्यपालांनी लगेच कायद्याची मोहोर उमटवली. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे सामन्यात म्हटले आहे.

सरकार आणि राजभवन असेच परस्परपूरक वागले तर…

राज्यपालांच्या सहीशिवाय अध्यादेश मंजूर होणार नव्हता. मात्र कायदेशीरदृष्ट्या कमकुवत अध्यादेशावर सही करायला ते तयार नव्हते, ही त्यांची भूमिका चुकीची म्हणता येणार नाही, असेही सामनातून म्हटले आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या अध्यादेशावर राज्यपालांची सहीही सकारात्मक घडामोड म्हणायला हवी. सरकार आणि राजभवन भविष्यातही असेच परस्परपूरक काम करत राहिले, तर ते महाराष्ट्राच्या हिताचेच आहे, असे म्हणत सामनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानण्यात आले आहेत.

(हेही वाचाः तुम्ही तुमची सत्ता सुरक्षित ठेवा, पण महिलांच्या सुरक्षेचे काय? भाजपाचा सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.