महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरून घमासान चर्चा झाली. खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांनी त्या वेळी घेतलेल्या निर्णयांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर गुरुवारच्या सुनावणीला सुरुवात झाली असून ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपालांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने घेतलेल्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे
कपिल सिब्बल शिंदे गटाच्या भूमिकेवर बोट ठेवत म्हणाले की, आधी शिंदे गट म्हणाला होता की, ते पक्षातून बाहेर पडले आहेत. नंतर ते म्हणाले की, आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत. आता म्हणतात की, आम्ही पक्षातच आहोत. अशा प्रकारे शिंदे गटाने वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. एकनाथ शिंदेंना विश्वासघात केल्याचे बक्षीस म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.
पुढे सिब्बल म्हणाले की, व्हीप फक्त सभागृहातच बजावला जाऊ शकतो. सभागृहाबाहेर व्हीप काम करू शकत नाही, असा बुधवारी युक्तिवाद करण्यात आला होता. मग शिंदे गट आसाममध्ये काय करत होता? आसाममध्ये तुम्ही भाजपच्या मांडीवर बसून एका अशा प्रतोदला पदावरून हटवत आहात, जो राजकीय पक्षाने नियुक्त केला होता. तसेच कशाच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला की, ते विधिमंडळ पक्षनेते आहेत. तुम्हाला तर २२ जून रोजीच पदावरून दूर केले होते.
(हेही वाचा – मविआचे सरकार पाडण्यासाठी शिंदेंनी राज्यपालांचा वापर केला ; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद)
Join Our WhatsApp Community