वाईट काळात युती टिकली, मग चांगले असतानाच का तुटली? मुख्यमंत्र्यांचा सवाल 

भाजपा-शिवसेना एकत्र येणार का? याचे उत्तर शोधायचे असेल, तर भूतकाळात डोकवावे लागेल. वेगळे का व्हावे लागले? हे शोधावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

86

शिवसेना हा हिंदुत्वावर निवडणूक लढवणारा पक्ष आहे. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला. त्यावेळी भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष अस्पृश्य होते. पण एक वेड दोन्ही पक्षांमध्ये होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही वाईट काळात एकत्र होतो. मग चांगले चालले असताना वेगळे का झालो? हे का घडले? हा प्रश्न मलाच नाही जनतेलाही पडला आहे. एका विचारावर झालेली युती तुटली का? हा प्रश्न आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एका प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

युती पुन्हा करायची असेल, तर तुटली का शोधावे लागेल!

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एक कौटुंबिक नाते होते. नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चांगले नाते आहे. नात्यामध्ये राजकारण का आणायचे?, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपा-शिवसेना एकत्र येणार का? याचे उत्तर शोधायचे असेल, तर भूतकाळात डोकवावे लागेल. वेगळे का व्हावे लागले? हे शोधावे लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा : मुंबई लोकल सर्वांसाठी बंदच! लेव्हल ३ची बंधने लागू! )

आमच्यात कुरबुरी असत्या, तर सरकार चाललेच नसते!

तीन पक्षाचे सरकार कधी येऊ शकेल हा विचार माझ्याही मनात कधी आला नव्हता. हे राजकीय अकल्पित घडावावे लागले.कोरोना संकटामुळे राजकीय पक्षाचे बळ असलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचता येत नाही. गावपातळीवर हा एकोपा करण्याचा कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू करता आलेला नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. शिवसेना मनापासून काम करतेय. भाजपासोबत असतानाही शिवसेनेने काम केले. युतीतून बाहेर पडण्याचा विचार नव्हता. पण आता आघाडी झाली. चांगली कामी करण्यासाठीच एकत्र यायचे आहे. मग युती असो किंवा आघाडी. आमचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी कायम राहणार आहे. आमच्यात जर कुरबुरी असत्या, तर हे सरकार चाललेलच नसते. हे सरकार स्थापन झालं, तेव्हा सगळ्यात नवखी व्यक्ती फक्त मुख्यमंत्री म्हणजेच मी होतो. मी कधीच विधिमंडळात गेलेलो नव्हतो, असं असतानाही सरकार चांगलं काम करत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना धोक्याची घंटा!

माझ्या मते कोरोना ही धोक्याची घंटा आहे. ती सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या डोक्यात वाजली पाहिजे. ती न वाजता आपण याही काळात राजकारण करत बसलो, एकमेकांवर आरोप करत बसलो आणि लोकांकडे दुर्लक्ष केलं, तर मात्र देशात अराजक येईल, असे सांगत जनतेचा विचार करा, अर्थव्यवस्था कशी मजबूत होईल, त्याचा विचार करू. हा काळ ओसरल्यानंतर आहेच ना राजकारण. सरकार पाडापाडीचे धंदे कुठे सुरू असतील तर थांबा ना थोडं. लोकांचे जीव चालले आहेत आणि तुम्हाला खुर्च्या दिसतायत. लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. खुर्ची देणारे जगले नाहीत, तर तुमच्या खुर्च्यांवर बसून तुम्ही करणार काय? आत्ता कृपा करून राजकारण थांबवा. असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.

(हेही वाचा : धक्कादायक! केरळमध्ये लसीकरणासाठी मुसलमानांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ घोषित!)

विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला! 

गेल्यावेळी लॉकडाउन शब्द वापरला नाही, पण निर्बंध लॉकडाउनसदृश्य लागू करावे लागले. मागच्या वेळी १५ दिवस उशीर झाला. गेल्या वेळी सगळ्यांना विश्वासात घ्यावे लागले. सगळ्यांशी बोलण्यात वेळ गेला. त्यामुळे हे निकष लागू केले. अजूनही निर्बंध उठवल्याचं जाहीर केलेले नाही. स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे. प्रशासनाला मदत होण्यासाठी हे निकष ठरवण्यात आले आहेत. कारण प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेता यावा, म्हणून हे करण्यात आले आहे. पण, निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होती. त्यात दहावी-बारावी परीक्षेचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यात हे निकष सूचवण्यात आले. त्यात विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला. त्यांना वाटले ठरले. त्यामुळे त्यांनी जाहीर केले. पण प्रशासनाला आढावा घेण्याची सूचना करण्यात आली होती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा :अधिकृत अनलॉकची घोषणा! गोंधळ संपला!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.