महापालिकेच्या प्रकल्प कामांच्या खर्चापुढे मुदत ठेवींमधील रक्कम कमीच

142

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली असून या सर्व मुदत ठेवी तशाच ठेवून मुंबईची विकास कामे केली जात नाही, अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले  जात आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये ८९ हजार कोटींच्या ठेवी असून त्यातील सुमारे ३२ ते  ३३ हजार कोटींच्या मुदत ठेवींना कोणत्याही प्रकारचा हात लावला जावू शकत नाही. तर उर्वरीत ठेवींमधील रक्कमच विकास प्रकल्पांसाठी वापरली जाऊ शकते. परंतु महापालिकेने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचा खर्चच ९० हजार कोटींच्या घरात असून या सर्व प्रकल्पांचा खर्च गृहीत धरल्यास ठेवींमधील रक्कमच तुटपुंजी असल्याचे स्पष्ट होत  आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारचे महापालिकेच्या ठेवींवर लक्ष

मुंबई महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या  विकासकामांचा आढावा घेत रस्त्यांवरील खड्डयांच्या प्रश्नावरुन प्रशासनाला धारेवर धरले. रस्त्यांवर खड्डे पडत असताना रस्त्यांच्या विकासाची कामे हाती घेण्याची गरज आहे, परंतु महापालिका मुदत ठेवींमध्ये पैसे वाढवत  आहे, अशा प्रकारचे वातावरण मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर निर्माण झाले होते. तर काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विकासकामांचे भूमिपूजन करताना राज्यात डबल इंजिनचे सरकार आल्यापासून मुंबईचा विकास होत असल्याचे सांगितले. महापालिकेचा पैसा बँकेत पडून आहे म्हणून विकास होत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारचे महापालिकेच्या ठेवींवर लक्ष असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

(हेही वाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडीत वाद; प्रकाश आंबेडकरांना सुनावले)

५७ ते ५८ हजार कोटींचा निधी जमा

या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपण या मुदत ठेवी वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तत्कालिन महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी कोस्टल रोडसह मुंबईतील मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या कामांसाठी फंजिबल एफएसआयच्या माध्यमातून मिळणारा महसूल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड म्हणून जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यातून आतापर्यंत सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. अशाप्रकारे एकूण सुमारे ५७ ते ५८ हजार कोटींचा निधी जमा असून एवढाच निधी महापालिकेला कोस्टल रोडसह इतर प्रकल्पांसाठी वापरता येणार आहे.

प्रकल्पांच्या कामांच्या खर्चापुढे ठेवीची रक्कम कमी

तर भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन निधी, उपदान निधी, निवृत्ती योजनाच्या मुदतठेवी, इतर विशेष निधी, कंत्राटदारांकडून घेण्यात येणाऱ्या अनामत रकमेसह परत करावी लागणारी, चर खोदण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम अशाप्रकारे एकूण ३२ ते ३३ हजार कोटींची रक्कम असून ही रक्कम संरक्षित असल्याने या निधीला हात लावता येणार नाही. त्यामुळे महापालिकेकडे प्रकल्पांसाठी खर्च करण्यासाठी ८९ हजार कोटींपैंकी केवळ ५७ ते ५८ हजार कोटी रुपये एवढीच रक्कम आहे. त्या तुलनेत मुंबई महापालिकेच्यावतीने ३१ विविध प्रकल्पांसाठी सुमारे ९० हजार ३०९ कोटींची गरज असल्याने मुदत ठेवींचा आकडा मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात प्रकल्पांच्या कामांच्या खर्चापुढे ही रक्कम फारच कमी असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.