सिल्वर ओकवरील हल्ला हे एक राजकीय षडयंत्र असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच या राजकीय षडयंत्रामध्ये नेमके कोण व्यक्ती आहेत, याचा तपास करण्यासाठी सोमवारी पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागीतली असल्याचे समोर आले आहे. सिल्वर ओकवरील हल्ला हा कुठल्या राजकीय पक्षाचे षडयंत्र आहे तसेच कुठल्या राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला घडवून आणला गेला याची पोलखोल लवकरच करण्यात येईल, अशी शक्यता पोलीस यंत्रणेकडून वर्तवण्यात येत आहे.
सदावर्तेंची कोठडी वाढली
‘सिल्वर ओक’वर एसटी कर्मचारी यांनी केलेले आंदोलन. त्यानंतर करण्यात आलेला हल्ला या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी जेष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० जणांना अटक केली होती. शनिवारी सुट्टीकालिन न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती व इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
म्हणून करण्यात आली कोठडीत वाढ
सोमवारी सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांडमध्ये सिल्वर ओक वरील हल्ला हे एक प्रकारचे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता नकारता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच,आंदोलक व समाजामध्ये एकमेकांची भावना भडकावून राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मुद्दाम निर्माण केला जातो. याबाबतची दाट शक्यता असल्याचे दिसून येत असून, या राजकीय षडयंत्रामध्ये नेमके कोण आहेत. तसेच त्यांचे पडद्यामागील सुत्रधार कोण याचा तपास करण्यासाठी गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडे चौकशी करायची असल्याचे, सांगत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली होती.
( हेही वाचा: कंपनीच्या गेटवरच तब्बल 20 ईलेक्ट्रिक गाड्यांनी घेतला पेट! )
सिल्वर ओक वरील हल्ला हा राजकीय षडयंत्र असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केल्यामुळे नक्की या हल्यात कुठल्या राजकीय व्यक्तीचा समावेश आहे. हे लवकरच पोलीस तपासात समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून वर्तवण्यात येत आहे.