लसीकरणाच्या माध्यमातून भाजपमध्येच श्रेयाची लढाई

कोटक यांच्या या मागण्या मान्य झाल्या तर याचे श्रेय त्यांना मिळेल. त्यामुळे कोटकांना श्रेय मिळू नये, म्हणून दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी आयुक्तांची भेट घेतली.

मुंबईकरांसाठी मोफत लसीकरणाच्या मागणीवरुन दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. परंतु भाजपच्या या शिष्टमंडळाच्या भेटीच्या आदल्या दिवशी भाजपचे महापालिका माजी गटनेते आणि ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी भेट घेऊन प्रशासनाकडे याच मुद्द्यांसह मुंबईत घरोघरी जाऊन लसीकरण करणे आणि लसींची खरेदी महापालिकेने करावी, अशी मागणी केली होती. मात्र, कोटक यांनी मांडलेले मुद्दे प्रशासन मान्य करणार आहे याची कुणकुण लागल्यानेच भाजपच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतली. पण या शिष्टमंडळात खुद्द कोटकांना डावलले. त्यामुळे एकप्रकारे भाजपमधील अंतर्गत चढाओढ स्पष्ट दिसून येत आहे.

भाजपचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यांनी १० मे रोजी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपचे मुंबई प्रभारी अतुल भातखळकर, माजी मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आणि महापालिका प्रभारी भालचंद्र शिरसाट यांच्यासह लसीकरणाच्या मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणानुसार खासगी रुग्णालय व राज्य सरकार आता लसींच्या एकूण उत्पादनाच्या ५० टक्के खरेदी करू शकते. त्यामुळे महापालिकेने राज्य सरकारच्या माध्यमातून लसींची खरेदी करुन मोफत लसीकरणाची तातडीने तयारी करावी, अशी सूचना केली.

(हेही वाचाः गरीब, मध्यमवर्गीयांच्या मोफत लसीकरणासाठी भाजपचा ‘हा’ पर्याय)

कोटकांना श्रेय मिळू नये म्हणून…

परंतु जे मुद्दे या शिष्टमंडळाने मांडले होते, त्या सर्व मुद्द्यांवर आदल्याच दिवशी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली होती. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी खासगी रुग्णालयांशी एनजीओंना संलग्न जोडून त्या माध्यमातून लोकांना घरोघरी जाऊन मोफत लसीकरण दिले जावे. यासाठी जे व्यवस्थापन शुल्क एनजीओ खासगी रुग्णालयाला देईल, महापालिकेने खासगी रुग्णालयात लस उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन सोसायटी ते सोसायटी लसीकरण करता येईल. तसेच यासाठी महापालिकेने स्वत: लसींची खरेदी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. कोटक यांनी केलेल्या या दोन्ही मागण्या मान्य झाल्या. महापालिकेने आज ५० लाख लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ग्लोबल निविदाही मागवल्या आहेत. भाजपच्या नेत्यांना कोटक यांनी स्वतंत्रपणे घेतलेली भेट रुचली नाही. कोटक यांच्या या मागण्या मान्य झाल्या तर याचे श्रेय त्यांना मिळेल. त्यामुळे कोटकांना श्रेय मिळू नये, म्हणून दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी आयुक्तांची भेट घेतली. परंतु प्रत्यक्ष बैठकीत लसीकरणाचे ठोस मुद्दे त्यांना मांडताच आले नसल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः शिवसेने पाठोपाठ भाजपचाही महापालिकेच्या मुदत ठेवीवर डोळा)

एकीकडे महापालिकेचे स्वप्न, दुसरीकडे अंतर्गत राजकारण

विशेष म्हणजे दरेकर यांच्यापेक्षा आशिष शेलार हे महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जायचे. आजही त्यांचा अभ्यास आहे. परंतु प्रत्यक्षात या बैठकीत ते केवळ उपस्थिती पुरतेच होते अशीही माहिती मिळत आहे. कोटक हे मुंबई महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक आहेत. अभ्यासू गटनेता म्हणूनही त्यांचा नावलौकीक आहे. पण खासदार बनल्यानंतर त्यांचे महापालिकेतील लक्ष थोडे कमी झाले आहे. त्यामुळे आपल्याकडील अनुभवाच्या जोरावर त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा अनुभवी नेत्यांची मदत घेण्याऐवजी पक्ष आता त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. त्यामुळे या माध्यमातून भाजपमधील अंतर्गत वाद समोर आलेला असून, एका बाजूला भाजप मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याची स्वप्ने पाहत आहे, तर दुसरीकडे त्यांचे नेते एकमेकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहेत. कोविड काळात रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्याऐवजी धोरणात्मक निर्णय कशाप्रकारे घेता येतील, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करायला पाहिजे हे कोटक यांनी दाखवून दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here