भाजपाची कार्यकारिणी बैठक या ‘तीन’ ठरावांवर होणार चर्चा

90

महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाची प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार असून भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांबाबत या बैठकीत पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी दिली. या बैठकीत तीन मुख्य ठरावांवर चर्चा होणार आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या एक दिवसाच्या कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी करणार आहेत.

मुख्य तीन ठराव 

कार्यकारिणी बैठकीत तीन ठराव मांडण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एक ठराव असेल. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्याला राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे समर्थन याविषयी एक ठराव असेल. महाविकास आघाडी सरकारकडून समाजाच्या सर्वच घटकांची फसवणूक झाली असून, त्याची चर्चा राजकीय ठरावात करण्यात येईल. राज्यातील विरोधी पक्ष म्हणून भाजपा प्रभावी कामगिरी करत आहे. पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा मान्यवरांच्या मार्गदर्शनातून आणि ठरावांद्वारे स्पष्ट होईल, असे उपाध्ये यांनी सांगितले.

(हेही वाचा : पोलिसांची मोठी कारवाई! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा )

मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक 

या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे उपस्थित राहणार आहेत. कार्यकारिणी बैठकीस भाजपा पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष हे मुंबईत उपस्थित राहतील. तसेच विविध जिल्हास्थानी पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन पद्धतीने कार्यकारिणी बैठकीत सहभागी होतील, असे केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.