क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा! नवाब मलिक करणार भांडाफोड

जसजसे पुरावे हातात लागतील तसतशी NCB ची पोलखोल करणार आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

क्रुझवरील कारवाईमध्ये एनसीबीने १० लोकांना पकडलं होतं. मात्र त्यापैकी २ लोकांना सोडलं असल्याचं समोर आलं आहे. ज्या दोघांना सोडण्यात आलं, त्यामध्ये भाजपाच्या एका नेत्याचा मेहुणा असून, याबाबतचं भांडाफोड शनिवारच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का, असा सवाल उपस्थित होतो, असेही नवाब मलिक म्हणाले.

वानखेडेंना सवाल

भाजपाचा कोण नेता आहे त्याचं नाव उद्या घोषित करणार असल्याचे, सांगतानाच NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना ८ ते १० लोकांना पकडले आहे, असे सांगितले होते. एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो, असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपाचा तो हायप्रोफाईल नेता असून, त्यानेच सगळं गॉसिप केलं आहे. पहिल्यांदा म्हटले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे, त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा, असा सवाल नवाब मलिक यांनी करतानाच NCB ला याचं उत्तर द्यावंच लागेल, असेही नवाब मलिक म्हणाले.

(हेही वाचा : भारताच्या ‘डोस’नंतर ब्रिटन सुधारले! घेतला मोठा निर्णय)

कारवाई विरोधात कोर्टात जाणार

परमबीर सिंग देखील जनतेचा सेवक होता. शर्मापण जनतेचे सेवक होते. परंतु देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्तीदेखील त्यातील आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या, त्यामध्ये २० किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामे आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात लागतील तसतशी यांची पोलखोल करणार आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. अजित दादांच्या कंपन्यांवर आयकर विभागाची कारवाई होते आहे, आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, ते या प्रकरणात अगोदर खुलासे मागू शकले असते, परंतु त्यांनी तसं न करता केवळ बदनामी करण्याचा प्रकार केला आहे. अशा प्रकारच्या कारवाई विरोधात कोर्टात जाणार आहोत, असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजपच्या काही आजी – माजी मंत्र्यांनी बँका बुडवल्या

महाविकास आघाडी सरकारचे नेते कुणाला घाबरणार नाहीत. महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहेत. भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे भाजपाच्या गंगेत डुबक्या मारणे असं आहे का? आता जे भाजपमध्ये गेले त्यांनी भाजपच्या गंगेत डुबकी मारली आहे. भाजपच्या काही आजी – माजी मंत्र्यांनी बऱ्याच बँका बुडवल्या आहेत. त्यांची प्रकरणे देखील आम्ही बाहेर काढणार आहोत. नुसते आम्ही आरोप करत बसत नाही. पुराव्यासकट आम्ही आरोप करणार आहोत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान काही बाहेरचे हायप्रोफाईल लोकं हे सगळं प्रकरण हँडल करत आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here