आव्हाडांना ‘ते’ वक्तव्य भोवले! प्रत्यक्ष हजर रहा! उच्च न्यायालयाचा आदेश

नालासोपारा येथील कथित स्फोटके प्रकरणात बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. २१ जानेवारी २०२२ या दिवशी न्यायालयात उपस्थित राहून म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने आव्हाड यांना दिला आहे. हिंदु टास्क फोर्सचे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी आव्हाड यांच्या विरोधात न्यायालयात याचिका केली होती. २३ नोव्हेंबर या दिवशी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

काय आहे प्रकरण?

२०१८ मध्ये महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथील गोरक्षक वैभव राऊत यांच्या घरी धाड टाकली होती. या धाडीत स्फोटके मिळाल्याचा दावा दहशतवादविरोधी पथकाकडून करण्यात आला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘वैभव राऊत आणि त्यांचे २ साथीदार यांच्याकडून दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतलेले जवळजवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब तयार करण्याची सामुग्री मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. यातून महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता’, असे ‘ट्वीट’ केले होते, तसेच याविषयीचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला होता. विशेष म्हणजे या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या दहशतवादविरोधी पथक किंवा अन्य अधिकृत अन्वेषण यंत्रणेने अशा प्रकारे कुठेही घोषित केलेले नाही, तसेच या प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातही याविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही. असे असतांना आव्हाड यांनी कोणताही संदर्भ न देता हे ‘ट्वीट’ केले. अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी १२ ऑगस्ट २०१८ या दिवशी भाईंदर पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी ठाणे येथील जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात तक्रार केली होती. या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने निर्णय देतांना आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. या निर्णयाला अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर सुनावणी चालू आहे.

(हेही वाचा ‘या’ राज्यात बाराशे हिंदूंनी केली ‘घरवापसी’!)

आव्हाड काय म्हणाले होते?

‘ज्यांना मराठा आंदोलनाची बदनामी करून महाराष्ट्रात अराजकता निर्माण करायची आहे, ते लोक हेच आहेत. मराठा आंदोलनाची बदनामी करण्यासाठी हे लोक बॉम्बचा वापर करणार होते. समाजात द्वेष निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न होता. जर कुणा अब्दुलच्या घरात बॉम्ब सापडले असते, तर त्याला १५ मिनिटांत पाकिस्तानी ठरवण्यात आले असते. त्याचे नाते हाफिज मोहम्मदसमवेत जोडण्यात आले असते. त्याच्या समर्थनासाठी येणार्‍यांना दहशतवादविरोधी पथक घेऊन गेले असते’, असे आक्षेपार्ह वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओत केले असल्याचे अधिवक्ता खुश यांनी याचिकेत म्हटले आहे.

आव्हाड यांनी व्हिडिओमध्ये हिंदु-मुस्लिम असे वक्तव्य करून आणि ते प्रसारित करून दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात दंडाधिकार्‍यांनी हे व्हिडिओ पाहून हे वक्तव्य गुन्हेयुक्त असल्याचे म्हटले होते. हे आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाने आव्हाड यांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे, असे हिंदु टास्क फोर्सचे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल म्हणाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here