बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार?

81

राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. यासाठी बैलांचा सराव आणि शर्यत पुर्ववत सुरू करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. मंत्रालयातील त्रिमुर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

येत्या महिन्याभरात निर्णय

संविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडी शर्यत सुरू आहे, त्यांचाही अभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार म्हणाले.

(हेही वाचाः बैलगाडा शर्यतीसाठी मंत्रालयात बैठक! बंदी उठवण्यासंबंधी ठरणार का भूमिका?)

वरिष्ठ कायदा सल्लागारांची मदत घेणार

राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढवण्यासाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे देशी जनावरांच्या संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सकारात्मक

बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. यासाठी सराव सुरू करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. राज्यातील बैलगाडी स्पर्धा पुर्ववत सुरू राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करत आहे. स्पर्धा सुरू करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत. मंत्रालयातील प्रांगणात प्रथमच अशी बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी घेतल्याबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

(हेही वाचाः पडळकर ‘शर्यत’ जिंकलेच…)

दिलासा देण्याचा होणार प्रयत्न

शेतकरी आणि बैलगाडी मालक आणि विविध संघटनांची शर्यत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. बैलांचा सराव सुरू करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठका बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्यातून आलेल्या बैलगाडी मालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व सूचना मांडल्या. उपस्थित आमदारांनी बैलगाडी शर्यतीविषयी मनोगत मांडले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.