बापरे! केंद्राने रद्दीतून केली ४० कोटींची कमाई!

केंद्रीय कार्यालयांतील एकूण ८ लाख चौ. फूट जागा रिकामी झाल्याचे समोर आले.

प्रातिनिधिक छायाचित्र
केंद्र सरकारने देशभरात स्वच्छता मोहीम राबवली, पण स्वतःच्या कार्यालयांचे काय? वर्षानुवर्षे फायलींचा ढीग साचलेला प्रत्येक कार्यालयात पाहायला मिळतो, म्हणून मग केंद्राने २ ऑक्टोबरपासून केंद्रीय कार्यालयांत स्वच्छता मोहीम सुरु केली. आणि काय आश्चर्य! चक्क १३ लाख ७३ हजार २०३ फायली निकाली काढण्यात आल्या, त्यातून निर्माण झालेल्या रद्दीतून चक्क ४० कोटी केंद्राला मिळाले.

८ लाख चौ. फूट जागा रिकामी 

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या कामाचा आढावा घेतला, तेव्हा यामुळे कार्यालयांतील एकूण ८ लाख चौ. फूट जागा रिकामी झाल्याचे समोर आले. एकूण १५ लाख २३ हजार ४६४ फायली तपासण्यात आल्या त्यानंतर त्यातून १३ लाख ७३ हजार फायली निकाली काढण्यात आल्या.

२ लाख ९१ हजार तक्रारी निकाली 

या मोहिमेच्या अंतर्गत ३ लाख २८ हजार ३३४ सार्वजनिक तक्रारींपैकी २ लाख ९१ हजार ६९२ तक्रारी अवघ्या ३० दिवसांत निकाली काढण्यात आल्या. खासदारांच्या संदर्भातील ११ हजार ०५७ तक्रारींपैकी ८ हजार २८२ तक्रारींचा सोक्षमोक्ष लावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रलंबित प्रकरणे आणि सार्वजनिक तक्रारी वेळेत आणि प्रभावीपणे निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे या फायली निकाली काढण्यात आल्या. यामध्ये खासदारांनी केलेले पत्रव्यवहार, खात्याअंतर्गत पत्रव्यवहार, सार्वजनिक तक्रारी असा सर्व प्रकारचा कागदोपत्री दस्त बाजूला करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here