मुंबईत ८३ जागा कायम राखण्याचेच भाजपपुढे आव्हान

121

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून आढावा घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु मुंबई महापालिकेवर भाजप-शिवसेना युतीचा भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने १५० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असले तरी त्यांच्यापुढे प्रमुख आव्हान आहे ते म्हणजे विद्यमान ८३ नगरसेवकांच्या जागा कायम राखण्याचे. त्यामुळे भाजप आपल्या विद्यमान जागा कायम राखता येणे शक्य नसल्याने अन्य जागांवर कशाप्रकारे आपले उमेदवार निवडून आणून सदस्य संख्या वाढवता येईल यासाठी अधिक प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडणून आले होते. परंतु पुढे भाजपची संख्या ८३ होऊन राम बारोट आणि सुनील यादव यांच्या मृत्यूनंतर ही संख्या आता ८१ एवढी झाली आहे. तर शिवसेनेची संख्या मनसेचे पाच आणि जात पडताळणीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची वर्णी लागल्याने त्यांची नगरसेवक संख्या ९७ वर पोहोचली आहे. परंतु आता शिवसेनेची दोन शकले पडली असून त्यांचे नगरसेवक आता शिवसेनेत जाणार की उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहणार याबाबत माजी नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरु आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड आशिष शेलार यांनी १३४ जागांचे टार्गेट दिले होते. परंतु शेलारांच्या पुढे जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महापालिकेत १५० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शेलार यांनी महापालिका निवडणुकीला कामाला लागा असे सांगत १३४ जागांचे टार्गेट देत युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील असे सांगण्याचा प्रयत्न केला होता. याचाच धागा पकडून त्यावेळी अमित शाह यांनी आप अब भी संभ्रम मे है, बीएमसी में १३४ नहीं तो १५० जगा निकालने है. आणि हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती होईल, यात कुणीही संकोच बाळगू नये, असे सांगण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर आता सात महिन्यांनी अमित शाह हे पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा भिकाऱ्यांचीही पसंती वातानुकूलित लोकलला)

मुंबई महापालिकेत भाजपला १५० जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असले तरी प्रत्यक्षात भाजपला विद्यमान ८३ जागा कायम राखण्याचे प्रमुख आव्हान आहे. मागील ७ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासक नियुक्त आहे. त्यामुळे नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांचे महापालिकेतील अस्तित्वही संपले. त्यामुळे आजही भाजपचे माजी नगरसेवक हे चिडीचूप बसले आहे. भाजपचे अनेक माजी नगरसेवक हे भाजपच्या कमळ चिन्हावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या नावावर निवडून येवू याच अविर्भावात वावरत आहे. त्यामुळे भाजपचे काही मोजकेच माजी नगरसेवक हे प्रभागात सक्रिय असून त्यामुळे जे माजी नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये पुन्हा ते निवडून येतील का याबाबतची शक्यता कमी आहे. याबाबतचा अहवालही भाजपच्या सर्वेमधून समोर आला होता. त्यामुळे भाजपने काही कच्चा दुवा ठरणाऱ्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विशेष लक्ष घालण्याचा प्रयत्न केला असला, तरी निवडणूक लांबणीवर पडल्याने भाजपचे हे प्रयत्नही कमी पडताना दिसत आहे. त्यामुळे ज्या विद्यमान ८३ जागा आहेत त्या सर्व कायम राखणे हे भाजपचे प्रमुख आव्हान असून उर्वरीत जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना हेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच इतर जागांवर भाजपने परिचित चेहऱ्यांना संधी देण्याच्या दृष्टीकोनातून जबाबदारी टाकल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे भाजप पक्ष स्वबळावर १५० नगरसेवक निवडून आणणार नसून युतीच्या मदतीने त्यांना १५० जागांचे लक्ष्य गाठायचे आहे. त्यामुळे भाजपला ८३ जागा कायम राखल्या तरच १००च्या आसपास जागा जिंकता येवू शकतात. त्यामुळे शिवसेनेचे ५० नगरसेवक निवडून आल्यास युतीला १५० जागा निवडून आणता येईल. त्यामुळे भाजपने जर यापूर्वीच्या युतीच्या फॉर्म्युलानुसार पूर्वीच्या शिवसेनेप्रमाणे १६३ जागा लढवल्यास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला २२७ प्रमाणे ६४ जागा सोडाव्या लागतील आणि २३६च्या जागांनुसार शिवसेनेला ७० तर उर्वरीत जागा भाजप स्वत: लढेल असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपला विद्यमान जागा कायम राखण्यासाठी आधी सर्व प्रभागांची पहिल्यापासून विशेष मेहनत घेऊन भाजपचा ठसा चांगल्याप्रकारे उमटावा लागणार आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या बैठकीत या कच्च्या दुव्यांवर प्रथम विचार होण्याची शक्यता असून त्यानुसार उर्वरीत जागा जिंकण्यासाठी इतर पक्षातील परिचित चेहऱ्यांना पक्षात आणण्याच्या रणनितीवर विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.