मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य आणि आघाडीत बिघाडी!

राज्यात महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवणारे शरद पवार हे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. व्यासपीठावर बसलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. आधीच मागील दीड वर्षांपासून सत्तेत असूनही अंतर्गत धुसफूस पहायला मिळाली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने अंतर्गत हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.

शरद पवारही नाराज

राज्यात महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवणारे शरद पवार हे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या विधानावर शरद पवारांनीच नापसंती व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असताना अशा वक्तव्यांची गरज काय?, असा सवाल पवार यांनी केल्याचे सूत्रांकडून कळत आहे.

(हेही वाचा : धक्कदायक! सोनू निघाला २० कोटींचा करचोर?)

फडणवीस-पाटील एकाच गाडीत

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले असताना राष्ट्रवादीच्या डोक्यात देखील हालचाली सुरू झाल्याचे दिसतंय. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के. आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के.सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले.

काँग्रेसही अस्वस्थ

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज असताना दुसरीकडे काँग्रेस देखील नाराज असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस नेत्याची बैठक झाल्याची देखील माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here