- सुजित महामुलकर
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि शिवसेना उबाठा गटाकडे पक्षप्रवेशासाठी ओघ सुरू झाला होता. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र हा ओघ पूर्णपणे थांबून समुद्रात एखादी मोठी लाट येऊन किनाऱ्यावर आदळते आणि परत मागे फिरते, तसे काहीसे महाविकास आघाडीबाबत झाले. लोकसभेनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार या आशेवर राजकीय नेते ‘मविआ’च्या आश्रयाला आले खरे; पण ‘मविआ’ विधानसभा निवडणुकीत सपशेल आपटली आणि अनेकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे आता ‘मविआ’कडे जाणारी नेत्यांची लाट परत मागे महायुतीकडे येऊ लागण्यास सुरुवात झाली आहे आणि यामध्ये सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठाला बसण्याची चिन्हे आहेत.
२०१९ नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अचानक बदललेली राजकीय भूमिका पक्षाच्या अनेक नेत्यांच्या पचनी पडली नव्हती. पण ‘मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?’ पक्षप्रमुखांच्या भूमिकेला उघड विरोध करण्याची हिम्मत तेव्हा कुणाची झाली नाही. कधी स्वप्नातही विचार न केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती झाली. त्यानंतर अंतर्गत धुसफूस आणि घुसमट सहन न झाल्याने अखेर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि त्यांच्याच पक्षातील एक नेते एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. गेल्या तीन वर्षांत शिवसेनेसह शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षही फुटला आणि भाजपाप्रणीत सरकारमध्ये सामील झाला. मागील वर्षभरात अतिशय वेगाने घटना घडल्या.
(हेही वाचा – Ratan Tata Birthday Wishes : जगाला प्रेरणा देणारे सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे Marathi quotes!)
उबाठा गट फुटीच्या उंबरठ्यावर?
काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना उबाठा यांना एकत्रित २८८ पैकी ५० आकडाही गाठता आला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना कुणाची यांचे उत्तर दिले आणि जनतेनेही त्यांना उदार होऊन साथ दिली. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसेना उबाठा गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचा आढावा घेत असताना विद्यमान, तसेच माजी आमदार, पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. तेव्हा काहींनी हिंदुत्व सोडून मुस्लिम मतांसाठी भूमिका बदलल्याचा मोठा फटका बसल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मराठी माणूस, हिंदुत्व आणि पक्षाचा पूर्वीच्या आक्रमकपणा याशिवाय पक्षाला नवी उभारी मिळणार नाही, हेही लक्षात आणून दिले, असे एका आमदाराने सांगितले.
निवडणुकीतील पराभवानंतर नैराश्य
काही पराभूत आमदारांनी त्यांच्या व्यथा पक्षप्रमुखांकडे मांडल्या. आमदारांना राजकीय संरक्षण मिळाले नाही किंवा त्यासाठी पक्ष नेतृत्व उदासीन असून ‘चौकडी’च्या ताब्यात नेतृत्व आजही आहे, अन्य नेत्यांच्या मताला पक्ष पातळीवर किंमत दिली जात नाही, अशा तक्रारी मांडल्या. यापुढे जाऊन अनेकांनी आपापसात बोलताना नाराजी व्यक्त केली आणि उबाठा गट सोडण्याची इच्छा व्यक्त केली. एकूणच उबाठा गटात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नैराश्य पसरले असून मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठाला मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Local Update: मुंबईकरांचं टेन्शन वाढणार; रविवारी ‘तिन्ही’ मार्गावर Mega Block)
जळगाव, विदर्भ, कोंकण नाराज
जळगाव, विदर्भ, कोंकण, पुणे, मुंबई अशा काही ठिकाणी स्थानिक पातळीवर नेत्यांवर दाबाव असून पक्षत्यागाची बीजे उमलू लागली आहेत आणि त्याचे परिणाम लवकरच दिसू लागतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जळगावमध्ये भाजपाच्या २७ नगरसेवकांना फोडून शिवसेनेचा महापौर बसला. या पक्षकार्यात ज्या स्थानिक नेत्यांचा मोठा वाटा होता त्यांच्यावर पुढे कारवाई करण्यात आली. एरंडोल विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शप) गेली. त्यामुळे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी अपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उबाठा गटाने त्यांची हकालपट्टी केली होती. माजी उपमहापौर राहिलेले कुलभूषण पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. माने यांना ऐन निवडणुकीत पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर या जागी नव्या नियुक्त्या झाल्या नाहीत.
पुणे-मुंबईतही फटका
पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी लोकसभेपूर्वी ‘मविआ’च्या सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि लोकसभा लढवली आणि पडले. लोकसभेनंतर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उबाठामध्ये आसरा घेतला. पुण्यातून उबाठाचा एक नेता आणि काही नगरसेवक कंटाळून पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात येते. पक्षनेतृत्व पुण्यामध्ये फारसे रस घेत नसल्याने स्थानिक नेत्यांचे मनोधैर्य खचले आहे आणि ते वेगळ्या मार्गाने जाण्याच्या तयारीत आहेत. कोकण-मुंबईतही महापालिका निवडणूक जाहीर होताच एकामागोमाग एक मोठे धक्के उबाठाला देण्याची तयारी शिंदे यांच्या शिवसेनेने केल्याचे समजते. त्यामुळे येणारा काळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला कठीण असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community