काँग्रेस पक्षाची लक्तरे आता काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते चव्हाट्यावर आणत आहेत. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड केली, हे प्रकरण शांत होत नाही तोच आता काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पंजाबमधील संदर्भ घेत काँग्रेस पक्ष हा अध्यक्षविना पक्ष आहे, या पक्षात कोण निर्णय घेतो, हे माहित नाही, असा घराचा आहेर कपिल सिब्बल यांनी दिला.
आम्ही ‘जी हुजूर’ वाले २३ नेते नाही!
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षपदावरून पुन्हा एका प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्याची मागणी देखील केली. मी तुमच्याशी त्या काँग्रेसजनांच्या वतीने बोलत आहे, ज्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समितीला पक्षाध्यक्षांच्या निवडीसाठी पत्र लिहिले होते. आम्ही अजूनही प्रतिक्षेत आहोतआम्ही जी हुजूर वाले २३ नेते नाहीत. हे स्पष्ट आहे. आम्ही या विषयावर बोलत राहणार आहोत. आम्ही आमची मागणी धरून ठेवू. पाकिस्तानच्या सीमेपासून ३०० किलोमीटर पंजाबमध्ये काय होत आहे? आम्हाला तिथल्या परिस्थितीची माहिती आहे. आम्हाला इतिहास माहिती आहे. आम्हाला माहिती आहे, तिथे अतिरेकाचा उदय कसा झाला. काँग्रेसने निश्चित केलं पाहीजे की, एकजूट आहोत, असेही सिब्बल म्हणाले.
(हेही वाचा : मराठवाड्यात पावसाचे धुमशान! ओला दुष्काळासाठी सरकारवर दबाव!)
जी-२३ नेत्यांचा वाढता दबाव
काँग्रेस पक्षाच्या जी-२३ नेत्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाच्या सूचना केल्या होत्या. त्यावरून काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या नेत्यांना खडे बोल सुनावले होते. जी २३ मधील नेते कोरोनाकाळात बेपत्ता होते, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. त्याला कपिल सिब्बल यांनी उत्तर दिले होते. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक २३ जूनला होणार होती. मात्र कोरोनाचे कारण देत पुन्हा एकदा निवडणूक टाळण्यात आली होती. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला होता. विशेष म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद राहाणार आहे.
Join Our WhatsApp Community