शिवसेनेतून ४० आमदार घेऊन स्वतंत्र गट स्थापन करत राज्यात नव्याने सरकार स्थापन झालेल्या शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार पुढे टिकणार की हे सरकार कोसळणार, हे आता सोमवारी, ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे. सोमवारी होणाऱ्या सुनावणीत १६ बंडखोर आमदार पात्र राहणार की अपात्र होणार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्त मान्य केली, हा निर्णय योग्य होता की अयोग्य, याचा निवडा होणार आहे. या दोन्ही प्रकरणावरील निर्णयामुळे शिंदे सरकारचे भवितव्य निश्चित होणारच आहे, तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही भवितव्य स्पष्ट होणार आहे.
… तर शिंदे सरकारही कोसळले
एकनाथ शिंदे सुरुवातीला शिवसेनेचे २९ आमदार घेऊन महाराष्ट्राबाहेर पडले, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यानंतर शिंदे गटाला शिवसेनेचे एकेक करत आता ४० आमदार जाऊन मिळाले आहेत. मात्र त्या दरम्यान शिवसेनेने पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले म्हणून १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी उपाध्यक्ष झिरवळ यांना केली, त्यानुसार झिरवळ यांनी त्या आमदारांना नोटीस पाठवली. त्यामुळे शिंदे गटाने उपाध्यक्षांच्या १६ आमदारांच्या विरोधातील बजावलेली नोटीस आणि शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय या दोन्ही निर्णयांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने ११ जुलै रोजी सुनावणी स्थगित केली. तरीही एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी बहुमत चाचणी केली. तत्पूर्वी शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, परंतु मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. कारण नव्या सरकारलाही सोमवारी न्यायालयात काय निर्णय होतो त्याची धाकधुकी आहे. जर न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र ठरवले, तसेच अजय चौधरी यांची गटनेते पदावरील नियुक्ती ग्राह्य धरली, तर बहुमत चाचणीच्या वेळी उद्धव ठाकरे यांचा व्हीप मान्य होईल आणि सरकारला धोका निर्माण होईल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नजर खिळलेल्या आहेत.
(हेही वाचा औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती! शरद पवारांचा ठाकरे सरकारबाबत गौप्यस्फोट )
कोण काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेमध्ये देश आहे. उद्या कळेल या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था योग्य आहे की नाही. या निकालाकडे देशाचे लक्ष लागले. आमचा न्याय देवेतेवर पूर्ण विश्वास आहे. किती दबावाखाली न्याय व्यवस्थेचे काम चालू आहे, हे आम्हाला माहिती आहे. परंतु देशाला हे समजेल की, या देशाची न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. आम्हाला उद्या न्याय मिळेल, असे अपेक्षित आहे.
– संजय राऊत, शिवसेना नेते.
आमदारांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निर्णय घटनेनुसार आणि कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. उद्याच्या निकालावर महाराष्ट्र सह देशाचा लक्ष आहे. म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबविला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही.
– विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते.
(हेही वाचा प्रसंग बाका होता, ३ दिवस-रात्र झोपलो नाही! मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीच्या आठवणींना दिला उजाळा)
Join Our WhatsApp Communityज्यांना परत यायचे आहे त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत. ते लवकरच समोर येईल, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले. काही बंडखोर आमदारांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत. मात्र काही आमदारांना जबरदस्ती नेले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा.
– आदित्य ठाकरे, शिवसेना नेते.