पोलिसांकडून २ जणांना अटक
मंगरूळपीर, वाशिम येथे बाबा हयात कलदंर दर्ग्यातील उरूसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पाकिस्तानी झेंडे आणि क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र असलेले फलक हातात घेऊन नाचवण्यात आले. या घटनेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. काही धर्मांध जाणीवपूर्वक औरंगजेबाचे उदात्तीकरण करून राज्यातील शांतता भंग करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू पाहत आहेत. अशांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करता यावी, यासाठी शासनाने पूर्वलक्षी प्रभावाने एक अध्यादेश पारित करावा, तसेच पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली असली, तरी अशा प्रकारे औरंगजेबाचे उदात्तीकरण तथा पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यामागे काही षड्यंत्र आहे का, याचीही शासनाने सखोल चौकशी करावी. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्णसिंहासन फोडले, हिंदु मंदिरे फोडली, हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करून जनतेवर अत्याचार केले, छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, अशा हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे उदात्तीकरण हा महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. काही वर्षांपूर्वी अफलजखानवधाचे चित्र लावण्याने धार्मिक भावना दुखावतात, म्हणून त्या चित्रावर प्रतिबंध आणणारा आदेश तत्कालीन गृहमंत्र्यांनी काढला होता. तशाच प्रकारे औरंगजेबाचे उदात्तीकरण रोखण्यासाठी शासनाने कठोर असा शासन आदेश तात्काळ काढावा, अशी आमची मागणी आहे, असे हिंदू जनजागृती समितीने म्हटले.