कुर्ल्याला ग्रहण : २० दिवसांत अभियंत्याला मारहाण, शिवीगाळ करण्याची चौथी घटना

अभियंत्यांच्या संघटनाही राजकीय आंदोलने करत आहेत का, असा प्रश्न खुद्द अभियंत्यांनाच पडला आहे.

106

एल विभागातील कुर्ला पश्चिममधील भाजपाचे नगरसेवक हरीश भांदिर्गे यांनी पाणी प्रश्नावर पालिकेच्या जल अभियंता विभागातील सहाय्यक अभियंत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने मंगळवारी सर्व अभियंत्यांनी काम बंद आंदोलन केले. कुर्ला एल विभागातील २० दिवसांमधील अभियंत्यांना मारहाण, धक्काबुक्की आणि शिवराळ भाषा वापरण्याची ही चौथी घटना आहे.  यापूर्वी शिवसेनेच्या आमदार आणि नगरसेवकांकडून अशा घटना घडल्यानंतर शेपूट घालून बसलेल्या अभियंत्यांच्या संघटनेला भाजपाच्या नगरसेवकाकडून असा प्रकार घडल्यानंतर १०० हत्तीचे बळ अंगात  संचारले आणि २० दिवसांनंतर या विभागात आंदोलन पुकारले. म्हणजे शिवसेनेच्या आमदार आणि नगरसेवक यांच्याकडून असा प्रकार होतो, तेव्हा तो माफ होतो. अभियंत्यांच्या संघटना तेव्हा त्या अभियंत्यांच्या पाठीशी उभ्या राहत नाहीत. आणि भाजपाच्या नगरसेवकाने शिवीगाळ केल्यानंतर आपण अभियंत्यांच्या पाठीशी उभे आहोत, असा आव आणून आंदोलन करत असतात. आता अभियंत्यांच्या संघटनाही राजकीय आंदोलने करत आहेत का, असा प्रश्न खुद्द अभियंत्यांनाच पडला आहे.

भाजपाचे नगरसेवक हरीश भांदिर्गे यांनी या अभियंत्याला मंगळवारी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. प्रभाग क्रमांक १६४ मधील संजयनगर, नूरणी मशीद, सुंदरबाग, नवपाडा आदी भागात पिण्याच्या पाण्याची समस्या असून त्या अभियंत्यावर त्यांनी पाणी विकण्याचा आरोप करीत अभियंत्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच अभियंत्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. बुधवारी कुर्ला विभाग कार्यालयासमोर अभियंते या प्रकरणाच्या निषेधार्थ प्रखर आंदोलन करणार असल्याची माहिती म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुखदेव काशीद यांनी दिली.

New Project 23

(हेही वाचा : साडेपाच वर्षांत पदपथांची सुधारणा किती?)

अभियंता संघटनांना उशिरा जाग येते!

मागील दोन आठवड्यापूर्वी सहायक आयुक्तांच्या समोर इमारत व कारखाने विभागाच्या सहायक अभियंत्याला स्थानिक नगरसेवक, आमदार दिलीप लांडे यांनी धक्काबुक्की करत अपशब्द वापरले होते. त्यानंतर इमारत व कारखाने विभागाच्या सर्व अभियंत्यांनी परिमंडळ उपायुक्त, नगर अभियंता यांच्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कुणीच दाद दिली नाही. अभियंत्यांच्या संघटनेनेही त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२१ रोजी कुर्ला हनुमान टेकडी परिसरात स्थानिक नगरसेवक किरण लांडगे यांच्या उपस्थित सहायक अभियंता (जलकामे) नितीन कुलकर्णी यांनी अज्ञात व्यक्तीकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी १३ सप्टेंबर २०२१ रोजी स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली. आणि कुर्ला एल विभागातील जलकामे विभागातील १७ ते १८ अभियंत्यांनी जलाभियंता यांना निवेदन देत काम बंद आंदोलन केले. मात्र सहा दिवसांमध्ये कुठेही अभियंता संघटना पुढे आली नाही. जेव्हा भाजप नगरसेवक हरिष भांदीग्रे यांनी जलकामे विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली, तेव्हा मात्र अभियंता संघटनेचे पदाधिकारी एल विभाग कार्यालयात धडकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इमारत व कारखाने आणि जल कामे विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर गप्प बसणारी अभियंता संघटना २० दिवसानंतर चार्ज झाल्याने विभागातील अभियंतेच आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.

New Project 24

तेव्हा अभियंता संघटना कुठे गेल्या होत्या?

भाजप नगरसेवक हरिष भांदीग्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले , होय मी शिव्या घातल्या, पण का तेही जाणून घ्या. माझ्या विभागात मागील अनेक महिन्यापासून पाणी नाही. त्यामुळे गणपतीचा सण असल्याने योग्य नियोजन करत योग्य दाबाने पाणी मिळावे, अशी विनंती मी वारंवार केली. गणपतीच्या दिवसांत लोकांच्या घरात पाणी नाही. लोक माझ्याकडे तक्रार करतात. काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. तेव्हा माझ्या घरातही पाणी नव्हते. पण सहायक अभियंता जल कामांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे माझाच काय तर जनतेचाही संतापाचा पारा चढलेला आहे. हा अभियंता जनतेचे पाणी टँकरने खैराणी रोड वरील कंपन्यांना विकत आहे. आज मी केवळ शिवराळ भाषा वापरली तर म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन आंदोलन करत आहे. पण जेव्हा सहायक आयुक्तांच्या उपस्थितीत जेव्हा अभियंत्याला धमकावले जाते, तेव्हा या म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी कुठे गेले होते, असा सवाल भांदीग्रे यांनी केला आहे.

… आणि पाणी समस्या मिटली!

कुर्ला हनुमान टेकडी येथे मारहाण आणि धमकी दिल्याच्या तक्रारीबाबत शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक किरण लांडगे यांनी असा कोणताही प्रकार झाला नाही. नागरिकांनी त्यांना जाब विचारला होता. पण त्यानंतर मागील १५ दिवसापांसून असलेली पाणी समस्या मिटली. त्या विभागाला योग्य दाबाने पाणी येऊ लागले, असे लांडगे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.