राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या सरकारमधील तिन्ही पक्षांमधले मतभेद अनेकदा समोर आले आहेत. आता यामध्ये नवीन भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2022-23 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक खात्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पण यातील आकड्यांवर लक्ष दिले असता, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अखत्यारीत असणा-या खात्यांना शिवसेनेपेक्षा सर्वाधिक निधी देण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी होणार का, अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
(हेही वाचाः फडणवीस गोव्याच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांचं मोठं स्वागत पण…, राऊतांचं टीकास्त्र)
शिवसेनेपेक्षा तिप्पट निधी
अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणा-या एकूण 12 खात्यांसाठी एकूण 3 लाख 14 हजार 820 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही तरतूद शिवसेनेच्या खात्यांपेक्षा तिप्पट असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना नेत्यांकडे असलेल्या खात्यांच्या वाट्याला केवळ 90 हजार 181 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या खात्यांना देखील शिवसेनेपेक्षा जास्त म्हणजेच 1 लाख 44 हजार 193 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
असे आहे निधी वाटप
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याला शिवसेनेला मिळालेल्या एकूण निधीच्या निम्मा निधी देण्यात आला आहे. नगर विकास खात्यासाठी अर्थसंकल्पात 44 हजार 306 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 12 हजार 364 कोटी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 11 हजार 1 कोटी, तर कृषी विभागाला एकूण 12 हजार 721 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
(हेही वाचाः मनसेचा निर्धार! शिवसेनेची गाडी पुन्हा पलटी करणार)
राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी
अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याला 1 कोटी 43 हजार 600, नियोजन विभागाला 25 हजार 577 कोटी, ग्रामविकास विभागाला 26 हजार 593 कोटी, तर जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागासाठी 19 हजार 766 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुन्हा नाराजीचा सूर?
निधी वाटपाच्या बाबतीत आपल्यावर कायमंच अन्याय होत असल्याचे सांगत, शिवसेना आमदारांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आमदारांनीही आपल्याला मिळणा-या निधीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे या मुद्द्यावरुन आघाडी सरकारमधील नाराजी नाट्य लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचाः सोनिया गांधी म्हणाल्या, …तर मी, राहुल आणि प्रियांकाही राजीनामा देऊ!)
Join Our WhatsApp Community