मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आहे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन! या अपघाताची तातडीने चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. मात्र सकृत दर्शनी हा अपघात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाला आहे, असा संशय आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१२ मध्ये झालेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन झाले होते, त्याचे पुन्हा स्मरण झाले आणि या महामार्गाच्या सुरक्षेचा विषय पुन्हा चर्चेत आला.
महामार्गाच्या निर्मितीपासून अपघातांत वाढ
मुंबई-पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे, या उद्देशाने २००२ साली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवासाचे अंतर ३ तासांवरून अवघ्या ९० मिनिटांवर आले. परदेशातील विकसित देशांमधील महामार्गांच्या तोडीचा वेग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला मिळाला. मात्र विकसित देशांप्रमाणे वाहतुकीचे नियम असो अथवा नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने तितकी साक्षरता असो, याचा अभाव असल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. म्हणूनच ज्या वर्षी हा महामार्ग बनवण्यात आला त्या २००२ सालापासून या महामार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले. १४ वर्षांत अर्थात २००२ ते २०१६ दरम्यान पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या ९४ किलोमीटरच्या पट्ट्यावर तब्बल १४ हजार ५०० अपघात झाले आहेत. त्यामध्ये सुमारे १ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर २०१२ मध्ये, मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर (५०), अक्षय पेंडसे (३०) आणि पेंडसे यांचा मुलगा, प्रत्युष (२) यांचा कार चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजक ओलांडणाऱ्या वेगवान वाहनाला धडक दिल्याने मृत्यू झाला होता. द्रुतगती महामार्गावरील बौर जवळ हा अपघात झाला होता. अक्षय पेंडसे यांचे भाऊ तन्मय पेंडसे तेव्हापासून या महामार्गावर अपघात का होत आहेत, याविषयी संशोधन करत आहेत. त्यासाठी त्यांनी कौस्तुभ वर्तक या संशोधकासोबत व्यापक स्वतंत्र संशोधन केले आहे. त्यामध्ये उपरोक्त धक्कादायक अपघातांची आकडेवारी समोर आली.
(हेही वाचा गुलाब पाटलांना खडसावल्याबद्दल उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेंचे कौतुक)
सूचना फलकांबाबत उदासीनता
महामार्गावर वाहन चालकांसाठी असलेले सूचना फलक व्यवस्थित दिसत नाहीत. काही ठिकाणी जिथे तीव्र वळण आहे, ज्याठिकाणी खडक आहे, त्या ठिकाणी रेडियमचे सूचना फलक नाहीत. यामुळे जेव्हा धुके असते किंवा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा या सूचना धूसर वातावरणातही दिसत नाहीत. त्याचबरोबर महामार्गाच्या भोवती आपत्कालीन प्रतिसाद देणारे कक्षही ठराविक अंतरावर नाहीत, असे दिसून आले.
ट्रामा केअर सेंटर नाही
या महामार्गावर शेकडोंच्या संख्येने अपघात झाले आहेत, त्यामुळे महामार्गावर २४ तास ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची गरज आहे. ही सर्वात मोठी त्रुटी आहे, त्याकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष नाही. महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांकडे ट्रॅकिंगसाठी आधुनिक यंत्रणा नाही. त्यामुळे महामार्ग पोलिसांना वाहतूक नियमन करणे कठीण बनत आहे. अपघातग्रस्त वाहनांतील जखमींना मदत मिळेपर्यंत ती उभी करण्यासाठी महामार्गाच्या बाजूला सर्व्हिस रोड नाही, महामार्गाच्या भोवती गावांमधून मोटारसायकल चालकही महामार्गाचे कुंपण तोडून महार्गावर येतात. जे वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत.
(हेही वाचा विरोधकांशिवाय सुरू आहे पावसाळी अधिवेशन!)
वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन
वाहन चालक वेगाच्या मर्यादांचे उल्लंघन करून वाहन चालवतात, ही एक मोठी चिंता आहे. ८० किलोमीटर प्रति तास ही वेगमर्यादा क्वचितच कोणी पाळते. वाहनाची स्थिती क्वचितच तपासली जाते आणि महामार्गावर वाहने ब्रेकडाउन होणे ही चिंतेची बाब आहे. या सर्व परिस्थितीत एमएसआरडीसी आणि आयआरबी हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात.
एमएसआरडीसी आणि आयआरबी यांच्याकडून हलगर्जी
जेव्हा या द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली, तेव्हा हा महामार्ग ६ पदरी करण्यात आला होता. या महामार्गाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)ची आहे आणि आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) या कंपनीकडे महामार्गाची देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. एका बाजूला या महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसी आणि आयआरबी या दोन्ही संस्था यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यात हलगर्जी करत आहेत, तर दुसरीकडे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्याने पालन करताना दिसत नाही, असे या संशोधनातून समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community