शिवसेनेच्या राडेबाजीमुळे दसरा मेळाव्याच्या अडचणी वाढल्या!

113

दादरमधील शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्यानंतर या भागातील वातावरण बिघडले आहे.परंतु या भागातील बिघडलेले वातावरण आता शिवसेनेच्या अंगाशी येणार आहे. या दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असून यामुळे भविष्यात या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून राज्याचा गृहविभाग शिवसेनेला शिवाजीपार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी नाकारु शकते, असे बोलले जात आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर यांनी पाणी व सरबत वाटपाचा स्टॉल्स भाविकांच्या सेवेसाठी लावला होता. याच स्टॉल्सच्या शेजारी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांचा स्टॉल्स लावण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही शिंदे गट आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. यानंतर निर्माण झालेली परिस्थिती सामोपचाराने मिटवण्यात आली. परंतु त्यानंतर सोशल मिडियावर केलेल्या एका पोस्टनंतर शिंदे गटाचे शाखाप्रमुख तेलवणे यांच्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मारहाण केला. यानंतर तेलवणे तक्रार नोंदवायला गेल्यानंतर दादर पोलिस ठाण्याबाहेर पुन्हा एकदा दोन्ही गटाचे शिवसैनिक आमन सामने भिडले. याच दरम्यान सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून जमिनीवर फैरी झाडल्याचा आरोप केला. त्यानुसार सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, दादरमध्ये सदा सरवणकर यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याने दादरचा परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनसेनेही दादरचे बिहार करू नका असेच दोन्ही गटांना सुनावले आहे. येत्या दसऱ्याला शिवाजीपार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळावी म्हणून शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी महापालिकेत अर्ज केला आहे. या अर्जानंतर शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे. परंतु अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवसांमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या राडेबाजीमुळे शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन गटांमध्ये होत असलेल्या हाणामारीमुळे आणि राडेबाजीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत गृहखाते संबंधितांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारु शकतात. जर याठिकाणी शिवसेनेला परंपरागत दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्यास आणि पुन्हा दोन्ही गट आमन सामने येण्याची शक्यता असून हाणामारी व राडेबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची जिथे शक्यता असते तिथे गृहखाते स्वत: हस्तक्षेप करत अशा कार्यक्रमाला तथा मेळाव्याला परवानगी नाकारु शकते,असे बोलले जाते. त्यामुळे दादरमधील ही राडेबाजी शिवसेनेच्या अंगलट येण्याची जास्त शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.