महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात सरकारची छाप; निवडणुकीचा ध्यास

142

मुंबई महापालिका प्रशासक नियुक्त असल्याने आगामी अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप राहणार आहे. महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थसंकल्प बनवण्याचे काम सुरु असून येत्या अर्थसंकल्पात मुंबई सौंदर्यीकरणासोबतच रस्त्यांचे सिमेंटीकरण आदी कामांबरोबरच आगामी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या स्वप्नातील मुंबईतील विविध योजना आणि प्रकल्पांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प

महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सन २०२२-२३ चा ४५ हजार ९४९. २१ कोटींचा अर्थसंकल्प  मागील वर्षी सादर केला होता. मागील वर्षी ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्पाच्या तुलनेत सादर करण्यात आला होता. त्यामुळे सहा हजार कोटींची वाढ करत चहल यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही वाढ केली होती, परंतु   निवडणूक लांबणीवर पडल्याने तसेच राज्यातील ठाकरे सरकार जावून शिंदे आणि फडणवीस सरकार आल्याने यंदाच्या अर्थसंकल्पावर पूर्णपणे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची छाप दिसून येणार आहे.

(हेही वाचा बांगलादेशी हटाव, दादर बचाव; भाजप आक्रमक)

कोणत्या कामांना मिळणार प्राधान्य?

महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती झाल्यांनतर आणि ठाकरे सरकार जावून शिंदे आणि फडणवीस सरकार विराजमान झाल्यानंतर त्यांनी मुंबईत सुशोभिकरणाचे ५०० प्रकल्प हाती घेऊन त्यासाठी सुमारे १७०० कोटी रुपयांची कामे करण्याचे निश्चित केले असून पहिल्या टप्प्यात त्यातील ९०० कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. याशिवाय ४०० किलोमीटर लांबीचे सुमारे ६०८० कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिटची कामे तसेच यानंतर येत्या मार्च महिन्यांमध्ये ३५० किलो मीटर लांबीची सिमेंट काँक्रिटची कामे आदींचा समावेश केला जाणार आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्यावतीने हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांची निर्मिती तसेच इतर प्रकल्प आणि योजनांची कामे सरकारच्यावतीने प्रस्तावित करण्यात येत आहे.

मुंबईकरांना चांगल्या योजना, कर सवलत व शुल्क माफीही

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने विविध प्रकल्प व योजना राबवून त्या कामांच्या आधारे आगामी  निवडणुकीत सामोरे जाण्याची पूर्ण रणनिती शिंदे व फडणवीस सरकारची असल्याने अर्थसंकल्पांमध्ये मुंबईकरांना चांगल्या योजनांसह विविध कर सवलतीचा व शुल्क माफीचीही घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकूणच हा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे मांडणार असले तरी हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला जात असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासकांनी मांडलेला अर्थसंकल्प सरकारचाच असल्याने त्यातून विविध कर सवलतींची खैरात करुन मुंबईचा चेहरा चकाचक दाखवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे सहा महिन्यांमध्ये सरकारने किती चांगल्याप्रकारची कामे केली आहेत किंवा हाती घेतली आहे हे दाखवण्यासाठी हा अर्थसंकल्प प्रतिबिंब ठरणार असल्याने महापालिका आयुक्तांनीही तशाच प्रकारे अर्थसंकल्पाची मांडणी करण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.