गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सतत न्यायव्यवस्थेवर केल्या जाणा-या टीकांमुळे संजय राऊत यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएनशने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना, न्यायालय म्हणाले की अशा राजकीय नेत्यांच्या टीका झेलण्यासाठी न्यायव्यवस्थेचे खांदे मजबूत आहेत.
…तोपर्यंत काहीही म्हणू द्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर, संजय राऊत यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर टीका केली होती. इंडियन बार असोसिएनशने या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर, बुधवारी मुख्य न्यायमू्र्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली. न्यायव्यवस्थेबद्दल त्यांना जे काही म्हणायचे आहे ते म्हणू द्या. अशा टिपणींसाठी आमचे खांदे भक्कम आहेत. जोपर्यंत आमची सद्सद्विवेकबुद्धी शुद्ध आहे. तोपर्यंत त्यांना जे काही म्हणायचे ते म्हणू द्या, असे न्यायालयाने म्हटले आहे.
( हेही वाचा: महागाईचा फटका! फरसबीसह वाटाणा गेला शंभरीपार )
काय म्हटलंय याचिकेत
इंडियन बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, मंत्रिपद भूषणवणारे प्रतिवादी संपूर्ण न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याच्या मोहिमेत गुंतले आहेत. कारण न्यायालयांनी दिलेले निकाल त्यांना मानवत नाहीत. त्यांच्या विरोधकांना तुरुंगात ठेवण्याची किंवा अधिकार आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करुन त्यांना त्रास देण्यची त्यांची योजना या न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे अयशस्वी झाली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.