भिवंडी पीव्हीआर थिएटरची होणार चौकशी! विधानसभा अध्यक्षांनी काय दिला आदेश?

98

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट भिवंडी येथील पीव्हीआर सिनेमा थिएटरमध्ये चालू असताना त्याचा आवाज बंद करण्यात आला, त्यानंतर तो चित्रपट दाखवण्याचे बंद करण्यात आले. याचे पडसाद विधानसभेत उमटले. भाजपचे आमदार राम कदम यांनी असे प्रकार करणाऱ्या पीव्हीआर चित्रपटावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर विधानसभा तालिका अध्यक्षांनी सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला.

पीव्हीआर थिएटरवर कारवाई करण्याची मागणी 

भिवंडी येथील पीव्हीआर या चित्रपटगृहात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखवण्याचे बंद करण्यात आले. याप्रकरणी आमदार राम कदम यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला, त्यावेळी ते म्हणाले की, शिवरायांच्या महाराष्ट्रात भिवंडी येथील हसीना पीव्हीआर थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवणे थांबवले, या चित्रपटात हिंदूंवर झालेले अनन्वित अत्याचार मांडण्यात आले. असा हा चित्रपट दाखवणे थांबवण्यात आले आहे. हा प्रकार कुणी केला? कुणाच्या निर्देशावरून का निर्णय घेण्यात आला? आता बुकिंग डॉट कॉम या वेब साईटवरही हा चित्रपट हाऊसफुल असल्याचे दिसते, प्रत्यक्षात मात्र चित्रपटगृह रिकामे असते, हा खोडसाळपणा कोण करत आहे? त्यामुळे असा प्रकार करणाऱ्या पीव्हीआर चित्रपटाच्या मालकावर कारवाई करावी आणि थिएटर मालक संघटना यांना बोलावून त्यांना अधिकधिक थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यास आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली.

(हेही वाचा ‘द काश्मीर फाईल्स’वर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?)

९२ आमदारांचे निवेदन 

यावेळी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत या विषयावर बोलताना म्हणाले की, द काश्मीर फाईल्स हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा या मागणीसाठी ९२ आमदारांचे स्वाक्षरी केलेले निवेदन विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. त्याची दाखल घेऊन त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली.

चौकशी करून कारवाई होणार 

यावर विधानसभा अध्यक्षपदी तालिका अध्यक्षांनी भिवंडी येथील पीव्हीआर चित्रपट प्रकरणात चौकशी करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच चित्रपट करमुक्त करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल, असेही तालिका अध्यक्ष म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.