जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या युतीतील नेत्यांची BJP कडून कानउघडणी

256
जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या युतीतील नेत्यांची BJP कडून कानउघडणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे ७ खासदार असताना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेले शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादीचे राज्यातील महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी भाजपाच्या नेत्यांवर जी जाहीर टीका केली त्याने संतापलेल्या भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना या दोन्ही नेत्यांनाही चांगल्याच खरमरीत शब्दात कानपिचक्या देत कानउघडणी केली. (BJP)

मुंबईत पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, महायुतीतील पक्षाच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात. जाहीर वक्तव्य करणे टाळवीत. महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे योग्य आहे असे मला वाटत नाही. श्रीरंग बारणे व अनिल पाटील यांची नाराजी ना पक्षाकरिता, ना अजित पवारांकरिता, ना शिंदेंकरिता फायदेशीर आहे. आज जर बारणे प्रतापराव जाधव यांच्याजागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांचे आले असते. परंतु आपण मंत्री झालो नाही मग कुठेतरी आपला संताप, नाराजी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतून हे वक्तव्य आल्याचे सांगत दोन्ही नेत्यांना चांगलेच झापले. (BJP)

आज राज्यात भाजपाचे १०५ आमदार असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) झाले. पाच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे आमच्या आकड्याला इथे काहीच किंमत नाही का? अशी विचारणा करत, आम्ही एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदेंसोबत युती केलेली असून त्याचे सुतोवाच खा. श्रीकांत शिंदे यांनीही केले आहे की आम्ही जागांसाठी एकत्रित आलो नाही. तशा प्रकारची भूमिका बारणे किंवा संबंधितांनी घ्यायला पाहिजे. महायुतीतील पक्षाच्या आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा असून महायुतीतील सर्व प्रवक्ते, नेत्यांकडून आहे. लोकसभेची निवडणूक संपली आहे म्हणून आता बारणे व पाटील बोलायला मोकळे झालेत. त्यांच्यासाठी आमच्या आमदार, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलेय हे त्यांनाही माहित आहे. परंतु आपल्याला मिळाले नाही बोलले तर काय फरक पडतोय पाच वर्ष मी खासदार आहेना ही त्यांची भुमिका योग्य नसल्याचेही दरेकर यांनी ठामपणे नमूद केले. (BJP)

(हेही वाचा – Union Cabinet : राणे, कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का नाही मिळाले?)

याकडे दरेकरांनी वेधले लक्ष 

महायुतीत वितुष्ट निर्माण होईल असे कुणी वक्तव्य करू नये अशा सूचना सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्या पाहिजेत. कारण छगन भुजबळ, अनिल पाटील म्हणाले की आता विधानसभेसाठी आम्हाला ८० जागा भाजपाने दिल्या पाहिजे. मात्र त्याप्रमाणे ४० जागांच्या पक्षाला ८० जागा दिल्या तर उद्या शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षालाही ८०-९० जागा द्याव्या लागणार. हेच सूत्र लावले तर आमच्याही १०५ जागा आहेत. मग आम्हाला २१० जागा द्याव्या लागतील. पण ३७० चे विधिमंडळ नाही २८८ जागा आहेत. प्रॅक्टिकल राजकीय परिस्थिती आणि निवडणूक निकालावर पक्षाच्या चार भिंतीत चर्चा व्हाव्यात. जाहीर वक्तव्य टाळावीत, अशी नम्र विनंती राहील. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात तशीच विरोधकांकडूनही अपेक्षा व्यक्त केली जात आहे, याकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले. (BJP)

सरकारच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयावर बोलताना दरेकर म्हणाले की, तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून बसल्यानंतर मोदींच्या किंवा आमच्या महायुतीच्या मनात काय आहे त्याचे प्रतिबिंब पहिल्याच खुर्चीत बसल्यानंतर दिसलें आहे. केवळ पुतना मावशीचे प्रेम काँग्रेस आणि महाविकास आघाडीला होते त्यांनी आता यावर उत्तर द्यावे. शेतकरी आमच्यावर थोडाफार नाराज होता त्या शेतकऱ्याला विश्वास दिलाय की, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. नीट परीक्षेच्या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी ठाम भूमिका घेतलेली असून सरकार आणि संबंधित यंत्रणा झालेल्या प्रकारात लक्ष घालून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.