राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजप असा वाद जोरात रंगला असून, नवनवीन मुद्दे काढून भाजपने आजवर महाविकास आघाडीला जेरीस आणले आहे. आता तर रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन राज्यात ऐन कोरोना काळात राजकारण रंगले आहे. यावेळी विरोधकांच्या रडारवर आहेत ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे. मात्र, एकूणच मागील वर्षभराचा आढावा घेतल्यास ज्याप्रमाणे भाजपने शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले, त्यापेक्षा काही पटीने अधिक राष्ट्रवादीचे आणि खासकरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळचे नेते भाजपच्या रडारवर आहेत. आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणत्या मंत्र्यांवर भाजपने अचूक ‘वेळ’ साधून निशाणा हाणला, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
नवाब मलिक
राष्ट्रवादीची बाजू भक्कमपणे मांडण्याची भूमिका नवाब मलिक कायमच चोख बजावतात. म्हणूनच पक्षाने त्यांच्याकडे अल्पसंख्यांक मंत्री पदासोबतच, पक्षाच्या प्रवक्तेपदाची धुरा सोपवली आहे. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले नवाब मलिक देखील विरोधकांच्या रडारवर आले आहेत. ‘एका साठेबाजाला वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन विरोधी पक्षनेते व दोन आमदार स्वत: पोलिस ठाण्यामध्ये जातात, याचा अर्थ यामागे नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा महाराष्ट्राला मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न आहे’, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केल्यानंतर, आता त्यांना भाजपकडून चोख प्रत्त्युत्तर दिले जात आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी तर नवाब भाईंनी जावयाला कमी भेटावे, काहीही बोलतात हल्ली. शुद्धीत आहेत का हा प्रश्न पडतो अशी टीका केली आहे. तसेच नवाब मलिक यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप आमदार अतुल भातखळकर राज्यपालांना भेटणार आहेत.
(हेही वाचाः रेमडेसिवीरवरुन रात्रीस खेळ चाले… काय घडलं रात्री? वाचून धक्का बसेल!)
राजेंद्र शिंगणे
राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्या खास मर्जितले असून, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी पहाटेची ऐतिहासिक शपथ घेतली, तेव्हा त्या शपथविधीला शिंगणेही उपस्थित होते. या शपथविधीनंतर शिंगणेंनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधून, त्यांना याची माहिती दिली होती. तरी देखील त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. मात्र, सध्या राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असून, यावरुन जोरात राजकारण रंगले आहे. त्यातच ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने, अन्न आणि औषध प्रशासन विभाग विरोधकांच्या रडारवर आला आहे. एवढेच नाही तर ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मंत्र्यांच्या ओएसडीचा धमकीचा फोन आल्याचा आरोप आता भाजपने केला आहे. त्यामुळे आता राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे भाजपच्या रडारवर आले आहेत.
(हेही वाचाः हा सरकारचा निव्वळ कृतघ्नपणा… दरेकरांचा घणाघात!)
अनिल देशमुख
शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू, अशी अनिल देशमुख यांची ओळख. शरद पवार यांच्याच सांगण्यावरुन देशमुखांना महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचे गृह खाते मिळाले. मात्र सचिन वाझे प्रकरण समोर आले आणि पवारांचे अंत्यत विश्वासू असेलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख भाजपच्या रडारवर आले. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. त्यानंतर मात्र विरोधकांच्या टीकेची तलवार अधिकच धारदार झाली. मुंबई उच्च न्यायालयाने देखील परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. तेव्हा नैतिकतेच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. मुंबई उच्च न्यायालयाने अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
(हेही वाचाः सीबीआय चौकशीत अनिल देशमुखांचे एकच उत्तर ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’!)
धनंजय मुंडे
अजित दादांच्या खास मर्जीतले नेते म्हणजे धनू भाऊ. अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीची सर्व सूत्रे ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरुन हलल्याची चर्चा तेव्हा सुरू झाली. इतके सर्व होऊनही फक्त अजित पवार यांच्या जवळ असल्याने त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र, हे धनू भाऊ देखील चर्चेत आले, ते रेणू शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर. रेणू शर्मा यांनी
आपल्यावर 2006 पासून धनंजय मुंडे अत्याचार करत असल्याचा आरोप केला होता. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला होता. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबूकच्या माध्यमातून या प्रकरणावर आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत टीका केली होती.
(हेही वाचाः धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर! – शरद पवार )
जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात. त्याचमुळे त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये गृह निर्माण खाते देण्यात आले. फेसबूकवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अनंत करमुसे या इंजिनीअरला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात बेदम मारहाण केल्याची तक्रार, सदर इंजिनीअरने पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या मारहाणीच्या वेळी आव्हाड हेही बंगल्यात उपस्थित होते, असे त्यांचे म्हणणे होते. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांना अटक करत, या पाचही कार्यकर्त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. या मारहाण प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपकडून जोरदार आरोप झाले. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती. तसेच राज्यपालांसोबत घेतलेल्या भेटीमध्ये, भाजपच्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
(हेही वाचाः जितेंद्र आव्हाड वर्षभर आपण झोपला होतात काय?- भातखळकर)
Join Our WhatsApp Community