राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ४० आमदारांसह शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असली, तरी त्यांना समर्थन दिलेल्या आमदारांची यादी (एकूण संख्या) अद्याप विधानभवनापर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवारांच्या गटाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आमदारांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांशी फोनद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे कोणासोबत नेमके किती आमदार आहेत, याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे, ‘तुमच्यासोबत किती आमदार आहेत याचा आकडा सांगा’, असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारला असता, बहुसंख्य लोक आमच्यासोबत आहेत. पण, त्यांनी त्यांच्याकडे किती लोक आहेत ते सांगावे, असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे ५ जुलैपर्यंत संख्याबळाबाबत स्पष्टता येणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे.
(हेही वाचा – मुंबईत राष्ट्रवादीचं मंत्रालयासमोर नवीन कार्यालय)
त्यामुळेच अजित पवार यांच्या गटाने अद्याप आपल्या समर्थक आमदारांची यादी आणि संख्या याबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना दिलेली नाही, असे कळते. मात्र, यामुळे अजित पवार यांना राष्ट्रवादीचे गटनेते नेमताना त्यांच्या नावापुढे सत्तारुढ पक्ष की विरोधी पक्ष लिहावे, असा पेच अध्यक्षांसमोर निर्माण झाला आहे. कारण, जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरून हटवून त्या जागी अजित पवार यांनी नियुक्ती करण्यासंदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठविण्यात आले आहे.
शरद पवार गटाकडूनही संख्याबळ मागवणार
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याचा अधिकार हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांना आहे. विरोधी बाकांवर बसणाऱ्या पक्षांचे संख्याबळ पाहून अध्यक्ष यासंदर्भात निर्णय घेत असतात. मात्र, प्राप्त परिस्थितीत राष्ट्रवादीचे काही आमदार सत्तारुढ पक्षासोबत गेल्याने त्यांचे संख्याबळ कमी झाले आहे. परिणामी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विरोधी पक्षनेते पदासाठी दिलेल्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडूनसंख्याबळाची यादी मागविली जाणार असल्याचे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community