राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीच असाव्यात त्या इंग्रजीत नसाव्यात, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. दुकानांची तोडफोड केली, मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झाले. मराठी भाषेसाठी आग्रही राहणाऱ्या मनसेचे हे स्वप्न अखेर साकार झाले आहे. बुधवारी, १२ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाला मनसेच्या या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळे मंत्री मंडळाच्या बैठकीत दुकानांच्या पाट्या मराठीत लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्री मंडळाच्या निर्णयामध्ये काय म्हटले आहे?
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होतो. त्यामुळे दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या. त्यावर उपाययोजना करण्याचीही सातत्याने मागणीही होत होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेठ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानावरील पाट्या मराठीतच लावाव्या लागणार आहेत. तसेच मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
(हेही वाचा पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री काय करणार मागणी? राजेश टोपे म्हणाले…)
मनसेचे काय होते आंदोलन?
मराठी ही राज्य भाषा असल्याने राज्यात दुकानांवर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील एका जाहीर सभेत घेतली होती. त्यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले होते. त्यासाठी अल्टिमेटम दिला होता. अन्यथा मनसेस्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दुकानदारांना दिला होता. त्या अल्टिमेटमनंतर मुंबईसह, पुणे, नाशिक येथे मनसे कार्यकर्त्यांनी काही दुकानांची तोडफोड केली, त्यावर मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
Join Our WhatsApp Community