महायुतीचेच सरकार येणार; DCM Devendra Fadnavis यांचा ठाम विश्वास

71
महायुतीचेच सरकार येणार; DCM Devendra Fadnavis यांचा ठाम विश्वास
  • प्रतिनिधी

राज्यातील जनतेचा महायुतीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. यावेळी मुंबई महानगर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ काँग्रेस नेते रवी राजा, व उबाठाचे उपविभागप्रमुख बाबू दरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर भाजपामध्ये प्रवेश केला.

फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेशावेली मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, आ. तमिल सेल्वन, आ. पराग शहा, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह, राजेश शिरवडकर आदी उपस्थित होते. फडणवीस आणि शेलार यांनी रवी राजा, बाबू दरेकर यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करतानाच रवी राजा यांची भाजपा मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आल्याचे आ. शेलार यांनी जाहीर केले.

(हेही वाचा – Gangster Satish Kalia वर गुन्हा दाखल; पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर व्यावसायिकाकडे मागितली खंडणी)

यावेळी फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले की, महापालिका ज्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर गाजवली असे काँग्रेसचे मातब्बर नेते रवी राजा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला ही अतिशय आनंदाची बाब असून गेली सलग २३ वर्षे बेस्ट चे सदस्य म्हणूनही राजा यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती. त्यांचा अनुभव, दांडगा जनसंपर्क याचा पक्षाला निश्चितच फायदा होणार आहे. राजा यांच्या संपर्कामुळे आगामी काळात काँग्रेसचे अनेक प्रमुख नेतेही भाजपामध्ये प्रवेश करतील असे भाकितही फडणवीस यांनी यावेळी वर्तविले. तसेच उबाठाचे उपविभागप्रमुख दरेकर यांच्या प्रवेशामुळेही भाजपाची घाटकोपर मधील ताकद वाढणार असून त्याचाही तेथील उमेदवारांना फायदा होईल असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

मुंबई महानगरपालिकेतील जुने स्नेही आणि काँग्रेसचे अभ्यासू नेतृत्व अशी ख्याती असलेल्या राजा यांच्या भाजपा प्रवेशाने सायन कोळीवाडा परिसरात आणि बाबू दरेकर यांच्या प्रवेशामुळे घाटकोपर परिसरात भाजपाची ताकद वाढेल असा दावा आ. शेलार यांनी यावेळी केला. काँग्रेसने आपल्या अनुभवाचा फायदा करून घेतला नाही. आपण कोणत्याही पदाच्या अपेक्षेने भाजपामध्ये आलो नाही. मात्र यापुढे भाजपाची ताकद वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे राजा यांनी यावेळी ठामपणे नमूद केले. त्याचवेळी राजा यांच्यासह युवक काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक सावंत, आशिष राठी, सर्वन्ना रंगस्वामी, आर. के. यादव, सुनील वाघमारे, तबस्सुम शेख या काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भरारी पथकाची कारवाई; १७ लाख जप्त )

गोपाळ शेट्टी यांची समजूत काढू

पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी जरी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न चालू असून त्यात आम्हाला नक्कीच यश येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

काही ठिकाणी महायुतीतील कार्यकर्त्यांनी परस्परांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर काही ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरी झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक झाली असून एकमेकांच्या विरोधातील उमेदवार मागे घेण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.