वीर सावरकरांनी ३ दशकांपूर्वीच फाळणीविषयी केलेले सतर्क! उदय माहुरकर का म्हणाले सावरकर होते द्रष्टा पुरुष?

109

देशाची फाळणी होणार याविषयी देशाला वीर सावरकर यांनी १९३० पासूनच सतर्क करायला सुरुवात केली होती, कारण सर महमद इकबाल यांनी त्यावेळी म्हटले होते की, ‘मला पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान हा भूभाग भविष्यातील मुसलमानांची भूमी दिसत आहे’, असे सांगून त्यांनी फाळणीचा विचार जाहीरपणे मांडला होता. त्यावेळी मात्र गांधींना ‘स्वातंत्र्याचा लढा हिंदू – मुसलमान एकत्र राहिल्याशिवाय लढता येणार नाही’, असे वाटत होते, त्याचाच गैरफायदा मुसलमान घेत राहिले आणि नवनवीन मागण्या करू लागले. याउलट वीर सावरकर मुसलमानांना आवाहन करत होते की, ‘तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यात सोबत आला तर तुमच्यासोबत हा लढा लढू, नाही अलात तरी लढू आणि विरोध कराल तरी हा लढा लढू’, अशा प्रकारे थेट विचार मांडले होते, असे केंद्रीय माहिती आयुक्त आणि ‘ वीर सावरकर : दी मैन हु कुड हैव प्रिवेंन्टेड पार्टीशन’ या पुस्तकाचे लेखक उदय माहुरकर म्हणाले.

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि सह लेखक चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या’ वीर सावरकर : दी मैन हु कुड हैव प्रिवेंन्टेड पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे झाले. यावेळी स्वतः  केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित हे दृक्श्राव्य माध्यमातून उपस्थितीत राहिले.

(हेही वाचा वीर सावरकर यांचे विचार चिरंतन, कालातीत! प्रवीण दीक्षितांनी सावरकर युगाचा घेतला मागोवा)

वीर सावरकर पुनर्जीवित होत आहेत! 

आज ७० वर्षांनंतर देश ज्या समस्यांना सामोरे जात आहे, त्यांची भविष्यवाणी वीर सावरकर यांनी या आधीच केली होती. त्यांनी पाकिस्तान हा कायम बंडखोर राष्ट्र म्हणून भारताला त्रास देत राहील, त्याला पुन्हा भारतात घेतले पाहिजे, असे वीर सावरकर म्हणाले होते, त्या वेळी आसाममध्ये मुसलमान मोठ्या संख्येने राहू लागले होते तेव्हाही वीर सावरकर यांनी ‘आसामच्या संस्कृतीला यामुळे धोका पोहोचणार आहे’, असे म्हटले होते, तेव्हा पंडित नेहरूंनी त्याला विरोध केला होता, आज तेच घडत आहे. मात्र आता काही प्रमाणात वीर सावरकर यांच्या राष्ट्र उभारणीच्या विचारांप्रमाणे घडत आहे, हे आशावादी चित्र आहे. वीर सावरकर यांना पुनर्जीवित करण्याची गरज आहे आणि हे काम सुरू झाले आहे, असेही उदय माहुरकर म्हणाले.

वीर सावरकरांनी पहिल्यांदा मांंडली हिंदु राष्ट्राची संकल्पना! – चेतन राजहंस

स्वातंत्र्यवीर सावरकर हे दृष्ट्ये होते, त्यांनी त्या वेळी दिलेल्या सूचना, इशारे आणि संकटे आज शतप्रतिशत खरी ठरत आहेत. वीर सावरकर यांनी त्यांच्या जीवनात विविध विषयावर लिखाण केले, ज्यामध्ये भाषा, पत्रकारिता, समाजप्रबोधन, साहित्य इत्यादी विषयांचा समावेश आहे. पण वीर सावरकर यांचे अंतिम पर्वातील लिखाण आणि विचार आज ७० वर्षानंतरही अत्यंत गरजेचे वाटत आहेत, ज्यामध्ये त्यांनी हिंदुराष्ट्राची संकल्पना मांडली, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले.

(हेही वाचा गांधी-नेहरू यांची पत्रे हाच खरा माफीनामा! रणजित सावरकरांचा घणाघाती हल्ला)

भारत हिंदू राष्ट्र होणार, ही वीर सावरकर यांची भविष्यवाणी खरी होणार

जेव्हा देशात ‘हिंदी-चिनी भाई भाई’, अशा घोषणा दिल्या जात होत्या, त्यावेळी वीर सावरकर पहिले होते, ज्यांनी सांगितले की, ‘या भाई ला आधी नीट समजून घ्या आणि मग भाई म्हणा.’ त्याचा प्रत्यय १९६२ मध्ये आलाच. वीर सावरकर कायम म्हणायचे की, मी जे सांगतो ते काँग्रेसला १५ वर्षानंतर समजते. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर वीर सावरकर यांनी म्हटले होते की, ‘या देशाचे स्वत्व टिकवून ठेवायचे असेल, तर या देशाला हिंदू राष्ट्र बनवल्या शिवाय पर्याय नाही, आज नाही तर उद्या ते होणारच आहे, त्याप्रमाणे आज देशात हिंदू राष्ट्राचा विचार जाहीरपणे मांडला जात आहे, लवकरच वीर सावरकर यांची ही देखील भविष्यवाणी खरी ठरेल, असा विश्वास राजहंस यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा घरोघरी वीर सावरकर! सलग ५० दिवसात १०,००० घरात ‘राष्ट्रसूर्य दिनदर्शिका’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.