वीर सावरकर यांचे विचार चिरंतन, कालातीत! प्रवीण दीक्षितांनी सावरकर युगाचा घेतला मागोवा

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर यांनी त्यांच्या पुस्तकात वीर सावरकर यांचे स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीच्या काळातील आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील विचार सविस्तरपणे मांडले आहेत. फाळणीच्या वेळी वीर सावरकर यांनी मांडलेल्या विचारांवर आधारीत पुस्तक आज का गरजेचे आहे, याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे वीर सावरकर यांचे विचार अमर आहेत, त्यावेळी मांडलेले त्यांचे विचार आजच्या परिस्थितीला तितकेच समर्पक आहेत. वीर सावरकर यांनी १८९५ पासून ते १९५० या कालावधीत मोठ्या प्रमाणात लिखाण केले आहे, परंतु ते विचार आजही ताजे वाटतात आणि सध्याच्या परिस्थितीला अनुकूल वाटतात. त्यातून त्यांनी काढलेली अनुमाने काळाच्या मर्यादेवर विजय मिळवणारी चिरंतन, कालातीत आहेत, असे माजी पोलिस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित म्हणाले.

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि सह लेखक चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या’ वीर सावरकर : दी मैन हु कुड हैव प्रिवेंन्टेड पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे झाले. यावेळी स्वतः  केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित हे दृक्श्राव्य माध्यमातून उपस्थितीत होते.

(हेही वाचा गांधी-नेहरू यांची पत्रे हाच खरा माफीनामा! रणजित सावरकरांचा घणाघाती हल्ला)

…म्हणून वीर सावरकरांनी लिहिले सहा सोनेरी पाने! 

वीर सावरकर यांनी जाणीवपूर्वक सहा सोनेरी पाने हे पुस्तक लिहून भारतीयांना इतिहासातून स्फूर्ती घेण्यास प्रवृत्त केले. कारण ब्रिटिश असो, चीन, ग्रीस, युरोप असो या सगळ्यांनी त्यांचा स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला, तो वाचला जातो पण या देशांचे वैभव नामशेष झाले आहे, याउलट भारताचा इतिहास आजही प्रेरणा देतो, परंतु ब्रिटिशांनी खोडसाळपणे इतिहास चुकीचा रेखाटला. त्यात ‘भारतावर अनेक आक्रमणे झाली आणि येथील राजे पराभूत होत गेले’, असे बिंबवण्याचा प्रयत्न ब्रिटिशांकडून झाला आहे. दुर्दैवाने काही भाडोत्री इतिहासकारही त्यांचीच री ओढतात. म्हणून त्यावर संतापून वीर सावरकर लिहितात की, माझा इतिहासावर लिहिण्यामागचा उद्देश हा पिढ्यान् पिढ्या परकीय आक्रमणापासून देशाचे स्वातंत्र्य टिकवून कसे ठेवले, हे सांगण्यासाठी मी हे सहा सोनेरी पाने पुस्तक लिहीत आहे. वीर सावरकर लिहितात की, छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांनी खऱ्या अर्थाने देशाचे साम्राज्य टिकवून ठेवले. त्या काळच्या मुसलमान लेखकांनी मुस्लिम बादशहा यांच्यावर स्तुतीपर लिहिलेले आहे, असे वीर सावरकर म्हणतात. शाळा-महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमातून जाणीवपूर्वक वीर सावरकर यांचे हे विचार दूर ठेवले आहेत, ते विचार जेव्हा केव्हा वाचनात येतात, तेव्हा ते संबंधितांना भारावून टाकतात, असेही दीक्षित म्हणाले.

हिंदूंनी गीतेतील या वाचनाकडे दुर्लक्ष केले आणि विनाश झाला!  

वीर सावरकर असेही म्हणतात की, हिंदूंमधील अवगुणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हिंदू समाजाने घातलेल्या सात बंदी या हिंदू समाजाच्या पायातील सात बेड्या होत्या. या बेड्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा ब्रिटिशांनी घातल्या नव्हत्या, तर त्या हिंदूंनी स्वतः घातल्या होत्या. हिंदूंचे गुण त्यांनी विवेक न बाळगल्याने त्यांच्यासाठी दोष बनले. भगवतगीतेत संदेश आहे, गुण हे सापेक्ष आहेत, सत्व, रज आणि तामस या गुणाने माणसात भेद करण्याची गरज आहे, या संदेशाकडे हिंदूंनी दुर्लक्ष केले आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला, असेही प्रवीण दीक्षित म्हणाले.

(हेही वाचा सावरकरनिष्ठ विजयी! सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवीण दीक्षित यांचा दणदणीत विजय)

वीर सावरकर आणि हिंदुत्व, हिंदुराष्ट्र विलग करणे अशक्य! – रमेश शिंदे

सध्या वीर सावरकर यांचे विचार तोडून मोडून सांगण्याची पद्धत सुरू झाली आहे, ते हिंदू धर्माच्या विरोधात होते, असे म्हटले जाते, वास्तवात सावरकर यांनी ‘मारीता मारिता मरेतो झुंजेन…’ ही प्रार्थना अष्ठभुजा देवीच्या समोर घेतली होती, रत्नागिरीत समाजप्रबोधनाचे कार्य केले तेव्हा पतीत पावन मंदिर बांधले, त्यामुळे वीर सावरकर यांचे विचार तोडून मोडून सांगणारे हे सहा आंधळ्याप्रमाणे आहेत, त्यांना विशाल सावरकर कुणाला दोरी सारखे, कुणाला खांबा सारखे वाटतात. खरे तर वीर सावरकर यांच्यापासून हिंदुत्व विलग करता येत नाही. हिंदू राष्ट्राची संकल्पना वीर सावरकर यांनी १९३६ साली मांडली होती. त्यामुळे जर तुम्हाला वीर सावरकर यांचा विचार मान्य करायचा असेल, तर त्यांचे हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र मान्य करावे लागेल, तर तुम्हाला वीर सावरकर मान्य झाले असे होईल, असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांची उपेक्षा!

वीर सावरकर कायम म्हणायचे ‘स्वराज्य त्याला म्हणतात जिथे तुमचे स्वत्व सुरक्षित आहे, ते स्वत्व म्हणजे तुमचे विचार, पोषाख, तुमची भाषा, तुमचे शिक्षण.’ त्यातील एक भाषाशुद्धीचे कार्य वीर सावरकर यांनी सुरू केले, त्यातून जे आज शेकडो प्रचलित शब्द डावे आणि तथाकथित निधर्मी वापरतात ते वीर सावरकर यांनी दिले आहेत, असेही रमेश शिंदे म्हणाले. भारताला स्वातंत्र्य हे चरखा चालवून मिळाले असे म्हटले जात आहे, मग तो चरखा गोवा, हैद्राबाद मुक्ती संग्रामच्या वेळी का चालला नाही?, त्यावेळी सैनिकी कारवाई का करावी लागली? गांधींना स्वदेशी चळवळीचे जनक मानले जाते, वास्तवात तर स्वदेशी चळवळीची सुरुवात वीर सावरकर यांनी १९०५ मध्ये केली होती, पण त्यांचा उल्लेख नाही. स्वातंत्र्यानंतर १५ वर्षांनी त्यावेळीच्या काँग्रेस सत्तेला वीर सावरकर क्रांतिकारी होते आणि त्यांना पेन्शन सुरू केली पाहिजे, अशी आठवण झाली आणि १९६२ मध्ये वीर सावरकर यांना पेन्शन सुरू झाली, ती ते केवळ २ वर्षे घेवू शकले, स्वातंत्र्यानंतर कायम स्वातंत्र्य सैनिकांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत गेला, असेही रमेश शिंदे म्हणाले.

(हेही वाचा घरोघरी वीर सावरकर! सलग ५० दिवसात १०,००० घरात ‘राष्ट्रसूर्य दिनदर्शिका’)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here