‘त्या’ माजी मंत्र्याच्या हत्येची सुपारी देणारे मोकाट, धोका कायम

158

राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्याला पाच दिवस उलटूनही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही आरोपीचे नाव उघड झाले असले तरी हे दोन्ही आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्यामुळे हंडोरे यांच्या जीवाला धोका असल्याचे नाकारता येणार नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांच्याकडे विचारणा केली असता तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीची सर्व माहिती पोलिसांकडे असताना त्यांना अटक करण्यात एवढा विलंब का लागत आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

राजकीय पूर्ववैमनस्यातून रचला कट

राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना त्याच्याच पक्षातील निलेश नानचे याने धमकी देऊन त्याच्या हत्येसाठी संदीप गोरे नावाच्या व्यक्तीला सुपारी दिल्याची तक्रार हंडोरे यांनी ७ जानेवारी रोजी चेंबूरच्या टिळक नगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. निलेश नानचे याने राजकीय पूर्ववैमनस्यातून तसेच हंडोरे यांच्या प्रभावामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाची तिकीट मिळणार नाही या गोष्टीचा राग मनात धरून हंडोरे यांना जीवे ठार मारण्याचा कट रुचून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन संदीप गोरे याला जीवे ठार मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा निलेश नानचे आणि संदीप गोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा –सर्वच औषध पुरवठादारांनी हाफकिनला काळ्या यादीत टाकले, वाचा काय आहे कारण)

गुन्हा दाखल होऊनही अटक नाही

निलेश नानचे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असून चेंबूर परिसरात राहण्यास आहे. पोलिसांकडे हंडोरे यांनी सुपारी देणाऱ्याच्या नावासह तक्रार दाखल करून देखील पोलीस अदयाप आरोपीपर्यत पोहचू शकलेली नाही. गुन्हा दाखल होऊन ५ दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांनी हंडोरे यांची सुपारी देणाऱ्याला अटक केलेली नसल्यामुळे हंडोरे यांच्या जीवाचा धोका अद्याप टळलेला नाही. याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांच्याकडे विचारणा केली असता आरोपीचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.