लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसैनिकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले. राज्यातील सर्व लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मनसेचे आपले निरिक्षक नेमले होते. या निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक लोकसभा मतदार संघातील मनसैनिकांनी झपाटून काम केले असून सन २०१४ नंतर यंदा लोकसभेचा प्रचार करताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना निराश होण्याची वेळ आली नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसैनिकांना मतदारांना बाहेर काढून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यास यश आल्याने एकप्रकारचा उत्साह मनसेमध्ये पहायला मिळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील सराव सामन्याद्वारे मनसैनिक चार्ज झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. (MNS)
पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर करत मनसेने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रत्येक मनसैनिक आपल्या लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरला. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदार संघांमध्ये मनसेच्यावतीने महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मनसेच्यावतीने निरिक्षकांची नेमणूक केली होती. या निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निहाय मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. त्यात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार कशाप्रकारे करायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले. (MNS)
मुंबईतील उत्तर, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य, उत्तर पूर्व, दक्षिण मध्य आणि दक्षिण या सहा लोकसभा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, कोकण, रायगड, नाशिक यासह लोकसभा मतदार संघांमध्ये मनसैनिकांनी भाजपा आणि शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम केले. मुंबईतील दक्षिण, दक्षिण मध्य, उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर आणि उत्तर पूर्व यासर्व मतदार संघांमध्ये प्रत्येकी सुमारे एक ते सव्वा लाखांहून अधिक मतदार हे मनसेचे पक्के मतदार आहे. त्यामुळे यंदा मनसेने महायुतीचा प्रचार करता आपल्या मतदारांना कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, सन २००९ आणि २०१४मध्ये मनसेने आपले उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवले होते, परंतु त्यात यश न आल्याने सन २०१९च्या निवडणुकीत मनसे अलिप्त राहिली. मात्र यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत मनसे मत मागण्याचा प्रयत्न करताना मतदारांकडून त्यांना निराश होण्याची वेळ येत होती. (MNS)
(हेही वाचा – Powai Lake : पक्ष्यांची घरटी आणि त्यांच्या विणीचा हंगाम, पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम थांबवले)
विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे एकप्रकारे मॉक ड्रिलच…
अनेक मतदारांकडून त्यांना लोकसभेला आम्ही आपल्याला मतदान करू शकत नाही, मात्र विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला मदत करू असेही सांगण्याचा प्रयत्न करून त्यांना निराश केले होते. परंतु यंदा महायुतीला मतदान करण्याचे आवाहन मनसैनिकांकडून केले जात असताना मतदारही त्यांचे स्वागत करून त्यांचा मान राखताना दिसले. त्यामुळे मनसैनिकांना लोकसभेच्या निवडणूक प्रचारात मिळणारा मान पाहता त्यांनी झपाटून काम केले. त्यामुळे येणाऱ्या ४ जून रोजीच्या निकालात मनसेची मते ही निर्णायक ठरलेली पहायला मिळतील असा विश्वास मनसेच्या नेत्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे. (MNS)
विशेष म्हणजे एकप्रकारे मनसेची घडी विस्कळीत झाली होती. ही घडी या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून निट बसवण्याचा प्रयत्न झाला आहे. मनसेचा उमेदवार नसला तरी मरगळ आलेल्या मनसैनिकांमध्ये उत्साह आणि जोशी भरण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा फायदेशीर ठरला आहे. मात्र, या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार मनसैनिकांनी केला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे मॉक ड्रिलच कार्यकर्त्यांकडून मनसेने करून घेतले. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आता जागा झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मनसेचा कार्यकर्ता अधिक चार्ज होईल आणि त्याचा फायदा निश्चितच दिसून येईल असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (MNS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community