दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाच्या माध्यमातून केलेले दोन्ही अर्ज महापालिकेने नाकारले. गणेश विसर्जनाच्यावेळी शिवसेना अणि शिवसेना शिंदे गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमी या दोन्ही शिवसेना गटाला परवानगी नाकारण्यात आली असून, दोन्ही गटाला महापालिकेने गुरुवारी सकाळी पत्र पाठवून दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्याची कल्पना देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने अनिल देसाई यांनी २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता, तर त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनीही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगीकरता अर्ज दाखल केला होता. हे दोन्ही अर्ज महापालिकेकडे परवनगीच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, शिंदे गटाला वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जी उत्तर विभागाकडे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये जी उत्तर विभागाने या परवानगीबाबत विधी विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आल्याचे लेखी उत्तर शिवसेनेला दिले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला पोलीस उपायुक्तांकडून पत्र प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्यावेळी दोन्ही शिवसेना गटांमध्ये झालेली हाणामारी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटांमध्ये घडलेल्या घटनांचा संदर्भ देत आजही दोन्ही गटांमध्ये वाद शमलेला नसल्याचे या पत्रात म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. अशा परिरिस्थितीत शिवाजी पार्कसारख्या संवेदनशील परिसरात दोन्ही गटापैंकी एकाला परवानगी दिल्यास त्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,असे या पत्रात म्हटले असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा: देशभरात ‘या’ 10 राज्यांत PFI विरोधात NIA आणि ED ची छापेमारी; 100 हून अधिक लोकांना अटक )
त्यामुळे पोलिसांच्या पत्रानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागाने दोन्ही गटाला शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेत, दोन्ही गटांच्या अर्जदारांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवले असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आणि शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या निवासस्थानी या पत्राची प्रत गुरुवारी सकाळी पाठवण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आपल्याला हे पत्र मिळाले नसून, कदाचित त्यांनी कार्यालयात पाठवले असेल तर गेल्यानंतर कळेल, पण व्यक्तीशा मी अजून पाहिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क हेाऊ शकला नाही.
Join Our WhatsApp Community