Shivsena : शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची गरज

168
  • सचिन धानजी

शिवसेना पक्ष (Shivsena) दुभंगल्यानंतर प्रथमच शिवसेनेचे दोन्ही गट लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले आणि दोन्ही गटांनी आपली ताकद आजमावली. यात नकली शिवसेना कुठली आणि मूळ शिवसेना कोणती यावरून आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी जनतेने शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वीकारले. जनतेसाठी दोन्ही शिवसेना समानच असून लोकसभेच्या निवडणूक निकालावरून तसे दाखवूनही दिले आहे. मुळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावान शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धत मान्य नाही; म्हणून या पक्षाचे दोन तुकडे झाले. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेला पक्षाचे नाव मिळाले आणि त्यांचे मूळ निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण चिन्ह मिळाले. आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले असा जो काही कांगावा प्रत्येक सभांमधून केला जातो, ते पाहता चोरणे आणि मिळवणे यात फरक आहे, हे अजूनही उद्धव ठाकरे यांना समजलेले नाही. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना आणि उद्धव ठाकरे चालवत असलेली शिवसेना यात फरक असल्याने या पक्षाचे दोन गट झाले आणि निष्ठावान कार्यकर्ते जे बाळासाहेबांना मानत होते, ते शिवसेनेत गेले, तर कमर्शियल आणि बाहेरून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते हे उबाठा शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे दोन्ही शिवसेनेची जेव्हा तुलना गेली जाते, तेव्हा एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेली शिवसेनेच मूळ शिवसेना मानली जाते, जी आज बाळासाहेबांच्या विचारांवर चालली आहे. जसे की मराठी आणि स्थानिक मुद्दा, तसेच हिंदुत्वाचा मुद्दा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आता हिंदुत्वाचा मुद्दा राहिलेला आहे का ? मराठी माणसाची आठवण त्यांना होते का ? भगव्या शालीऐवजी हिरवी शाल अंगावर घेत काँग्रेसशी केलेली मैत्री हे शिवसैनिकांना पटलेले नाही आणि जर पटले असते, तर लोकसभेचा निकाल महाराष्ट्रात वेगळा दिसला असता.

एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला

दोन्ही शिवसेनेकडे (Shivsena) पाहण्याचा जनतेचा दृष्टीकोन आता बदलत चालला आहे. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात असली कोण आणि नकली कोण, हे दाखवून देऊ, अशी वल्गना करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने तोंडघशी पाडले. शिवसेनेचे एक ते दोनच खासदार निवडून येतील, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे भविष्य खोटे ठरले आणि त्यांचे ०७ खासदार निवडून आले, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ०९ खासदार निवडून आले. त्यामुळे जर दोघांचे स्ट्राईक रेट पाहिला, तर शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला दिसून येत आहे. १५ जागा लढून त्यांचे ०७ खासदार निवडून आले आणि २३ जागा लढून उबाठा शिवसेनेचे केवळ ०९ खासदार निवडून आले.

मुळात मुंबईच्या बाहेर उबाठा शिवसेनेचे जे ९ खासदार निवडून आले, त्यात मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलित मतांचा मोठा हातभार होता. ही जर मते बाजूला केली, तर उबाठा शिवसेनेच्या मूळ मतदारांनी त्यांच्या उमेदवारांना किती मतदान केले, हाही प्रश्न आहे. हिंदुत्ववादी पक्षासोबत युती केल्याने भाजपाच्या मतांची मदत शिवसेनेला मिळाली जी आजवर त्यांना परंपरागत मिळत आली. त्यामुळे ते शिवसेनेचे मूळ मतदार आहेत, जे युतीमध्ये कायमच शिवसेनेला मतदान करत आलेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना पाणी दाखवू, त्यांना उखडवून टाकू अशी वल्गना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकीत मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलितांची किती मते कायम राहतात, हे आधी पहावे. कारण लोकसभा निवडणुकीत मोदी विरोधातील लाटेचा फायदा झाला असला, तरी विधानसभेत अशी कोणती लाट निर्माण केली जाणार आहे की, त्यांची मते त्यांच्याकडे रहातील. त्यामुळे लोकसभेचे समीकरण विधानसभेत तंतोतंत लागू होईल, असे काही वाटत नाही. त्यातच विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्याने, तसेच त्यांच्या खात्यात पहिल्या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाल्याने, विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच ही योजना निवडणुकीपुरती असल्याचे नकारार्थी वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहे. जे सरकार चांगले काम करत आहे, त्यांचे कौतुक व्हायलाच हवे; पण आपण काही द्यायचे नाही आणि दुसऱ्याने दिले की, त्यांच्या विरोधात बोंबाबोब ठोकत चुकीची माहिती पसरवायची हा जो काही प्रकार सुरु आहे, त्याचीही नोंद जनतेच्या न्यायालयात घेतली जात आहे, हेही विरोधकांनी लक्षात घ्यावे. एक नकारार्थी वातावरण तयार केल्याने त्याचा फायदा लोकसभेत मिळाला; म्हणून विधानसभेतही तोच फॉर्म्युला वापरण्याचे जे काही षडयंत्र विरोधकांकडून सुरु आहे, तो डावही आता जनता पुरती ओळखून आहे. त्यामुळे जनतेच्या न्यायायलात शिवसेनेला अजुनही सिद्ध करावे लागणार आहे.

(हेही वाचा Uddhav Thackeray हे शरद पवारांनी सांगितले म्हणून मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्री शिंदेंनी केला पर्दाफाश)

लोकसभेतून आता शिकायला हवे!

भाजपाच्या मदतीने जेव्हा शिवसेना (Shivsena) उत्तम सरकार चालवत असते, तेव्हा एक उत्तम पक्ष म्हणूनही तो विभागाविभागांमध्ये कार्यरत व्हायला हवा. जर मोदींच्या विरोधात मुस्लिम एकवटत असतील, तर हिंदूंनी एकत्र यायला हवे आणि त्या आधी हिंदुत्ववादी पक्षासह त्यांच्या नेत्यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र यायला हवे. आज महायुतीमध्ये शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी पक्ष आहे. विभागांमध्ये स्वतंत्रपणे काम करताना जेव्हा युतीचा कार्यक्रम असेल, तेव्हा एकत्र येवून काम केले पाहिजे. तरच संघटनात्मक ताकद वाढली जाईल. आज ज्या पक्षाचे प्राबल्य ज्या भागांत आहे, त्या भागांत त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने कार्यालय थाटून जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपलब्ध व्हायला हवा. मूळ शिवसेनेत गटप्रमुख हा मतदारांना प्रेरित करणारा आणि पक्षाचा मुख्य कणा आहे. त्यामुळे शिवसेनेला गटप्रमुखांच्या निवडीसह शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, महिला उपविभागप्रमुख, विभागप्रमुख, विभाग संघटक आदींच्या नेमणूका करून मजबूत बांधणी करायला हवी, मुंबई वगळता शिवसेनेची ही बांधणी दिसत नाही, जी आज उबाठा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेने मुंबईत संघटनात्मक बांधणीकडेही लक्ष द्यायला हवे. पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश झाल्यानंतर तो जर वर्षा किंवा सह्याद्रीवर गर्दी करून असेल तर तो लोकांच्या समस्या कधी जाणून घेणार ? त्यामुळे जी काही रसद पुरवायची ती पुरवा पण पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा २४ तास जनतेच्या संपर्कात रहायला हवी, यासाठी विभागप्रमुखाने प्रत्येक प्रभागांमध्ये भेटी देऊन गटप्रमुखांना भेटायला हवे, मार्गदर्शन करायला हवे, पण याचा अभाव मुंबईत दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईच्या बाहेर शिवसेना वाढत असली, तरी मुंबईत दुर्लक्ष करून चालणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही बांधणी खूप महत्त्वाची असून किमान मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटची मजबूत टीम तयार होईल, अशी तरी कार्यकर्त्यांची टीम तयार व्हायला हवी. जर मुंबईत आपली तेवढी ताकद नसेल, तर खुल्या मनाने शिवसेनेने, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून त्यांनाही एकत्रपणे सामावून घेतले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेकडे पोलिंग एजंटही नव्हते आणि भाजपालाही विचारात घेतले नव्हते, त्याचा फटका मतदारांना बाहेर काढण्यात झाला. ती चूक विचारात घेता प्रत्येक मतदान केंद्रात युतीचे म्हणून पोलिंग एजंट नेमले जाणे बंधनकारक करावे लागतील, ज्यात शिवसेनेचे दोन आणि भाजपाचे दोन असतील. ज्यामुळे मतदान केंद्रातील मतदानाची वस्तूस्थिती दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि मतदारांना बाहेर काढण्यात यश मिळेल. असो, असे बरेच काही आहे.

शिवसेना (Shivsena) भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेवर पुन्हा आपला झेंडा फडकावयाचा असेल, तर विरोधकांप्रमाणे एकजूट दाखवूनही काम करावे लागेल, तरच विधानसभेच्या निवडणुकीचा पेपर सोपा जाईल, अन्यथा लोकसभेत जे झाले, तसे व्हायला वेळ लागणार नाही, त्यामुळे लोकसभेच्या निकालावरून महायुतीला खूप काही शिकण्यास मिळाले आहे. आता ते किती शिकून सज्ञान होतात आणि निवडणुकीला सामोरे जातात, हे लवकरच कळेल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.