विरोधकांशिवाय सुरू आहे पावसाळी अधिवेशन!

138

राज्यात भाजपाने दोन तृतीयांश शिवसेना फोडून सत्ता स्थापन केल्यावर त्याचे जे काय परिणाम आहेत ते सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री पदावर शिवसेनेत ज्यांनी खिंडार पाडले ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी सरकारची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार एक हाती चालवत आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सरकार स्थापन करतानाही फडणवीसांनी विरोधक आक्रमक राहणार नाही, याचीही पुरेपूर काळजी घेतल्यामुळे पावसाळी अधिवेशन विरोधकांशिवाय सुरू आहे, असे चित्र आहे.

काँग्रेसच्या नाराजीने महाविकास आघाडीत फूट

सरकार कोसळताच कालपर्यंत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस यांची तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गेली आहेत. त्यामुळे एक प्रकारे वरवर जरी महाविकास आघाडी अजूनही अस्तित्वात आहे, असे आघाडीचे नेते म्हणत असले, तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडी कधीच संपुष्टात आली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडे ५२ पैकी अवघे ११ आमदार उरले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षीय बलाबलमध्ये चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे आपसूकच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर ५४ आमदार संख्या असलेल्या राष्ट्रवादीने दावा केला आणि अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पदी बसवले. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या काँग्रेसने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद मिळावे अशी अपेक्षा केली, मात्र तिथेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेचे अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते पदी बसवून या सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे दोन्ही सभागृहात हाती काहीही न लागलेल्या काँग्रेसचा तीळपापड झाला असून काँग्रेसने आपला स्वतंत्र मार्ग निवडण्याची मानसिकता निर्माण केली आहे. सत्तेत असतानाही काँग्रेसला विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मदत केली नाही आणि सत्ता गेल्यानंतरही काँग्रेसला मानाचे स्थान दिले नाही, ही मानहानीच महाविकास आघाडी फुटण्याला कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीसोबत नसेल हे निश्चित आहे, हेच चित्र सध्या सभगृहामध्येही दिसत आहे.

(हेही वाचा राज्यातील ‘या’ १२ जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणार नवीन वैद्यकीय महाविद्यालये)

अंबादास दानवे प्रभावहीन

कालपर्यंत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी अनेक दिग्गजांनी आपला ठसा उमटवला आहे. नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर, रामदास कदम, विनोद तावडे, धनंजय मुंडे यांनी त्या त्या वेळी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते, त्या तुलनेत अंबादास दानवे तितके प्रभावी दिसत नाहीत. ग्रामीण भागातील चेहरा असला तरी त्यांच्यात तितकी आक्रमकता दिसत नाही, तसेच सध्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची शिवसेना विधिमंडळातील नेतृत्व नक्की कुणी करावे यातच अडकून पडली आहे, त्यामुळे दानवे त्यांना जमेल तसे विषय मांडत असेल, तरी ते तितके प्रभावी ठरत नाहीत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे फायर ब्रँड नेते अनिल परब हे विधान परिषदेत हाताची घडी करून बसतात, त्यामुळे सभागृहात शिवसेना फारशी आक्रमक दिसत नाही.

विधानसभेत राष्ट्रवादीतच नाराजी

विधानसभेत विरोधी पक्षनेते पदी असलेले अजित पवार यांनी २०१९ मध्ये जेव्हा शरद पवार भाजपाला बाजूला ठेवून शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेवून महाविकास आघाडी स्थापन करत होते, त्यावेळी अजित पवार रातोरात पळून फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथविधी उरकून सरकार स्थापन केले होते. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. खरेतर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद जयंत पाटील यांना हवे होते, पण ते न मिळाल्याने पाटील नाराज आहेत, पाटील विरोधी पक्षनेते पदी असते तर विधानसभेत काही प्रमाणात तरी विरोधक आक्रमक दिसले असते. सध्या विधानसभेत विरोधकांच्या बाजूने एकमेव आवाज दिसतो तो म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव. भास्कर जाधव जमेल तसे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत, मात्र सध्या उद्धव ठाकरे यांची शक्ती आणि भास्कर जाधव यांच्याकडे सध्या आमदार शिवाय कोणतेही पद नसल्याने त्यांचा आवाज कालसारखा प्रभाव टाकत नाही. त्यामुळे सध्या शिंदे-फडणवीस सरकारला मोकळे मैदान मिळाले आहे. कुठल्याही दिशेने बॅट फिरवली तरी चौकार आणि षटकार मिळत आहेत.

(हेही वाचा दिवस ठरवा आपण चर्चा करू; रिफायनरी विरोधकांना निलेश राणेंचे आश्वासन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.