मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्त व उपायुक्तांच्या बदलीचे आदेश काही दिवसांपूर्वी काढण्यात आले असून हे सर्व बदलीचे आदेश आजही कागदावरच आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक असलेल्या इक्बालसिंह चहल यांनी मागील काही दिवसांपासून सहायक आयुक्त तसेच उपायुक्तांचे बदली आदेश जारी केले आहेत.
परंतु आजवरच्या इतिहासात प्रथमच या बदली आदेशांचे पालन संबंधित अधिकाऱ्यांकडून न झाल्याने आजही बदली झालेले अधिकारी आपल्या जागेवर कायमच आहे. यावरून आता महापालिकेत प्रशासकांची प्रशासनातील अधिकाऱ्यांवरील पकड ढिली होत असल्याची बाब समोर येत आहे.
( हेही वाचा : महान ज्योतिर्भास्कर मोहित कंबोज यांची नवी भविष्यवाणी खरी ठरेल? )
१४ ऑगस्ट रोजी पुन्हा पाच सहायक आयुक्तांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यामध्ये अंडे यांची बदली एम पश्चिम विभागातून अतिक्रमण निर्मुलन विभागात करण्यात आली. तर किरण दिघावकर यांची बदली ई विभागातून पी उत्तर विभागात, तर पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील (मकरंद दगडखैर) यांची बदली एफ दक्षिण विभाग, एफ- दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची बदली ए विभागात, कार्यकारी अभियंता परिवहन विभागाचे अजयकुमार यादव यांची ई विभागाच्या सहायक आयुक्तपदी केली. यासह उपायुक्त डॉ संगीता हसनाळे (घनकचरा व्यवस्थापन) यांची बदली परिमंडळ एकमध्ये आणि परिमंडळ एकच्या उपायुक्तांची बदली हसनाळे यांच्या जागी करण्यात आली.
प्रशासक म्हणून चहल यांची कसोटी
परंतु बदलीचे आदेश निघून पाच दिवस उलटत आले तरी यातील मृदुला अंडे वगळता कुणाही अधिकाऱ्याने बदलीच्या ठिकाणचा पदभार स्वीकारला नाही. किरण दिघावकर हे परदेशात प्रशिक्षणाला गेले असल्याने महेश पाटील यांनी विभागाचा पदभार सोडला नाही, तर महेश पाटील हे न आल्याने स्वप्नजा क्षिरसागर यांनी ए विभागाचा पदभार स्वीकारला नाही. सहायक आयुक्तांबरोबरच उपायुक्त संगीता हसनाळे आणि चंदा जाधव यांनीही पदभार सोडलेला नाही. त्यामुळे सहायक आयुक्त तसेच उपायुक्तांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी या बदलीच्या आदेशामध्ये तसेच बदलीच्या ठिकाणी न जाण्यामागे दबावही वाढला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आयुक्तांचा सर्व वेळ अधिकाऱ्यांचे बदली आदेश न काढणे आणि दुसऱ्याची बदली आदेश थांबवण्यामध्येच जात असून प्रशासक म्हणून चहल यांची कसोटी लागत आहे. प्रशासक हे केवळ वरुन आलेल्या आदेशांचे पालन करताना आपल्यातील प्रशासकाला विसरत चालले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community