राणीबागेतील बहुचर्चित पेंग्विन कक्षाच्या देखभालीच्या कंत्राटावरून वादळ उठल्याने नवीन संस्थेची नेमणूक करण्यास होणारा विलंब लक्षात घेता प्रशासनाने जुन्याच कंपनीला दीड महिन्यांचा कालावधी वाढवून दिला आहे. या वाढीव कालावधीवर तब्बल ४५ लाख रुपये खर्च झाले आहे. नवीन संस्थेची निवड होईपर्यंत विद्यमान कंपनीला ही मुदतवाढ दिली आहे. स्थायी समितीने २०१८मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यमान कंत्राट कंपनी ही हाय वे कंस्ट्रक्शन असून नवीन निविदेमध्ये पात्र ठरणारी जी एकमेव कंपनी आहे ती सुध्दा हीच कंपनी आहे. त्यामुळे पेंग्विन कक्ष आणि पेंग्विनची देखभाल ही आयुष्यभराच्या कमाईचे स्त्रोत महापालिकेने हाय वे कंपनीला उपलब्ध करून दिला आहे.
४५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला
भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या अर्थात राणीबागेचे नुतनीकरण करताना पहिल्या टप्प्यात १८ मार्च २०१७ पासून प्राणिसंग्रहालयात हंबोल्ट पेंग्विन कक्ष सुरू करण्यात आला. हे हंबोल्ट पेंग्विन पक्षी परदेशातून प्रथमच भारतात आणले गेले. पण या पक्ष्यांचे व कक्षाची व्यवस्थापन प्रणाली महापालिकेकडे नसल्याने ११ सप्टेंबर २०१८ रोजी हाइवे कन्स्ट्रक्शन कंपनीची ३६ महिन्यांकरता नेमणूक करण्यात आली होती. ही मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली. त्यामुळे यासाठी मागवलेल्या निविदेची प्रक्रिया अद्यापही पूर्ण न झाल्याने तसेच नवीन कंपनीची निवड न केल्याने प्रशासनाने मुदत संपुष्टात आलेल्या हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीला आणखी ४५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे. हा कालावधीही आता १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संपुष्टात येत आहे.
(हेही वाचा : भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची जागा ताब्यात घेण्यापूर्वीच महापौरांनी दिली भेट)
११ कोटी ९१ लाख ९३ हजार ५६० एवढ्या खर्चास मान्यता
स्थायी समितीने ११ सप्टेंबर २०१८ मध्ये या प्रस्तावाला स्थापत्य शहर समिती व महापालिकेने मंजुरी देताना ११ कोटी ४६ लाख ०९ हजार १९२ अधिक ४ टक्के सादिलवार ४५ लाख ८४ हजार ३६७ असे एकूण रु. ११ कोटी ९१ लाख ९३ हजार ५६० एवढ्या खर्चास मान्यता दिली होती. परंतु सध्या या पेंग्विनच्या देखभालीसाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने सादिलवाराच्या रकमेच्या ४५.८४ लाख रुपयांची तरतूद शिल्लक असल्याने प्रशासनाने ३० सप्टेंबर २०२१ नंतर ४३ दिवस किंवा पुढील कंत्राटदाराची निवड होईपर्यंत त्याच संस्थेकडून काम करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या सेवांच्या देखभालीची जबाबदारी
- वातानुकूलीत यंत्रणा (HVAC SYSTEM)
- विद्युत यंत्रणा
- जीव रक्षक प्रणाली (Life Support System)
- पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा
- खाद्य माशांचा पुरवठा