कोरोना दरम्यान आरोग्य विभागाची भरती आवश्यक होती मात्र त्या जागेवर भरती झाली नाही. या रिक्त जागा सगळ्या भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीसंदर्भात जे घडलं ते नैतिक नव्हते. कुंपनच शेत खात असल्याचे समोर आले आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती होणं चुकीचं नाही. जे लोक या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यात कोणतीच अडचण नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. यावेळी त्यांनी एकही पैसा न घेता पुन्हा आरोग्य विभागाची परीक्षा घेणार असल्याचे सांगितले यासह आरोग्य भरतीबाबत मोठी घोषणा देखील त्यांनी केली.
आरोग्य भरतीसंदर्भात जे दोषी असतील त्या कोणालाही पाठिशी घालण्याचं काम महाविकास आघाडी करणार नाही. तसेच गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. या तपासादरम्यान, असे समोर आले की, गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
(हेही वाचा – ‘आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवड नकोच!)
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही
यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आक्रमक होत न्यासाला काम का दिलं असा सवाल उपस्थितीत केला आहे. म्हाडा, आरोग्य भरती, टीईटी परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळलं जात आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही, असे प्रविण दरेकर म्हणाले. यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले, निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करु. न्यासा कंपनी हायकोर्टात गेली होती. त्यानंतर न्यासाचं सिलेक्शन करण्यात आलं. आरोग्य विभागानं पाच लोकांना कळवलं त्यानंतर पाच कंपन्यांकडून डेमो घेतला. आरोग्य आय़ुक्त, सार्वजनिक आरोग्य सचिवांनी परीक्षा घेतली.
आरोग्य भरतीचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत
गट क साठी 15 लाख रुपये आणि गट क साठी 8 लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर आहे. अमरावतीमध्ये 200 विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत ही माहिती खरी आहे का? महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. यानंतर राजेश टोपे यासंदर्भात बोलताना असे म्हणाले की, दलालांची ऑडिओ क्लिप सायबरकडून तपासली जात आहे. तुमच्या सगळ्यांच समाधान करण्याची माझी जबाबदारी आहे. चौकशीत याची पाळंमुळं खोदून काढूया, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करु. आरोग्य विभागानं स्वत: एफआयआर केलेला आहे. आमचा हेतू स्वच्छ होता, असं राजेश टोपे म्हणाले.